चेन्नई : आॅस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शिखर धवनला सूर गवसणे महत्त्वाचे होते, अशी प्रतिक्रिया भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने दिली.वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान संघर्ष करणाºया धवनने रविवारी येथे तिसºया व अखेरच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ६२ चेंडूंना सामोरे जाताना ९२ धावांची खेळी केली. भारताने या लढतीत ६ गडी राखून विजय मिळवताना मालिकेत विंडीजचा ३-० ने सफाया केला.
रोहित म्हणाला,‘संघासाठी व खेळाडूंसाठी आॅस्ट्रेलिया दौºयापूर्वी धावा फटकावणे महत्त्वाचे होते. शिखर धवन एकदिवसीय मालिकेत चांगली फलंदाजी करीत होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. तो सामना जिंकून देणारी खेळी करू शकल्यामुळे मला आनंद झाला. महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी सूर गवसणे आवश्यक असते.’
रोहित पुढे म्हणाला,‘रिषभही धावांचा भुकेला आहे. ही त्याच्यासाठी चांगली संधी होती. आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये दोन विकेट गमावल्या होत्या. थोडे दडपणही होते. त्यांनी दडपण चांगल्याप्रकारे हाताळले. ही सामना जिंकून देणारी भागीदारी होती. दोन्ही खेळाडूंनी धावा फटकावणे संघाच्या दृष्टीने चांगले आहे.’
भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौºयाची सुरुवात ब्रिस्बेनमध्ये २१ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसह करणार आहे.रोहित म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियाचा आगामी दौरा एकदम वेगळा राहील. विंडीजविरुद्ध ३-० ने विजय मिळवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आॅस्ट्रेलियात चांगली कामगिरी नेहमीच आव्हानात्मक असते. आॅस्ट्रेलिया दौरा एक खेळाडू, व्यक्ती आणि संघ म्हणून नेहमीच परीक्षा असते. आॅस्ट्रेलियात वेगळ्या प्रकारचा खेळ होईल.’रोहितने सांगितले की, ‘विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या तयारीच्या दृष्टीने अनेक सकारात्मक बाबी घडल्या. त्यात क्षेत्ररक्षणाचाही समावेश आहे.’
आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात रोहितलाही स्थान मिळाले आहे, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हा सलामीवीर फलंदाज म्हणाला की, ‘मी फार दूरचा विचार करीत नाही. त्यापूर्वी बराच वेळ आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आम्हाला टी-२० आंतरराष्ट्रीय आणि सराव सामने खेळायचे आहेत. मी कसोटी सामन्याबाबत विचार करीत नाही. मी फार दूरचा विचार करीत नाही. मी काही दिवसांच्या ब्रेकनंतर आॅस्ट्रेलिया जाण्याबाबत आणि टी-२० मालिकेच्या तयारीबाबत विचार करीत आहे.’
रोहितने संघातील युवा खेळाडू कृणाल पांड्याची प्रशंसा केली. त्याच्यासारख्या बेदरकार क्रिकेटपटूमुळे भारताला लाभ होईल, असेही तो म्हणाला. टी-२० मालिकेदरम्यान दिग्गज यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीबाबत बोलताना रोहित म्हणाला, ‘धोनी श्रीलंकेत निदाहस ट्रॉफीमध्येही खेळला नव्हता. धोनीची संघातील उणीव जाणवते. त्याच्या उपस्थितीमुळे केवळ माझाच नाही तर अनेक खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावतो. विशेषता युवा खेळाडूंचा.’ (वृत्तसंस्था)पराभव लाजिरवाणा असला तरी आम्ही टक्कर दिली - ब्रेथवेटमालिकेत ३-० ने क्लीनस्वीप होणे लाजिरवाणे असले तरी मर्यादित क्षमतेसह आम्ही मालिकेत चांगली लढत दिली, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिज टी-२० संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने व्यक्त केली.सामन्यानंतर ब्रेथवेट म्हणाला,‘३-० ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे वाईट वाटते आणि कर्णधार म्हणून माझ्यासाठी ही लाजिरावाणी बाब आहे. पण, आमच्या खेळाडूंनी लढवय्या खेळ केला. एक संघ म्हणून आम्ही उपलब्ध पर्यायांचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पहिल्या लढतीमध्ये आम्ही चांगली लढत दिली. आम्ही गोलंदाजीमध्ये आपली क्षमता सिद्ध केली.’ब्रेथवेटने युवा फलंदाज निकोलस पूरणची प्रशंसा केली. ब्रेथवेट म्हणाला,‘पूरणने केवळ मोठे फटके खेळले नाही तर त्याने काही रिव्हर्स स्कूपही खेळले. त्याने धावसंख्येला चांगला वेग दिला. पूरणचे षटकार आकर्षक होते, पण त्याने संथ सुरुवात केली होती. खेळपट्टी जाणून घेणे, त्यासोबत ताळमेळ साधणे व फटके खेळण्यासाठी योग्य वेळ निवडणे, हे पूरणच्या खेळीतील वैशिष्ट्य ठरले. विंडीजला खेळाडूंकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे.’