जोहान्सबर्ग, दि. 23 : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू ए.बी डिव्हिलियर्स वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार झाला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याने याबाबतची माहिती दिली. डिव्हिलियर्सनंतर आता दक्षिण आफ्रिकेचा कसोटी आणि टी-20 कर्णधार फाफ डूप्लेसीकडे वन डे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात येण्याची शक्यता आहे.
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत तो म्हणतो, दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट मंडळाने मला एवढी वर्ष संघाकडून खेळण्याची संधी दिली. मी संघाऐवजी स्वतःचा विचार केल्याची टीकाही माझ्यावर झाली. पण हे सत्य नव्हते. दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. गेल्या वर्षभरापासून माझ्या कर्णधारपदाविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण आता मी माझी भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. मी एकदिवसीय सामन्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा देतो आहे. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये आपण खेळणार असल्याचंही डिव्हिलियर्सने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षभरात मी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलो आहे. आता मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचे आहे. २००४ पासून दक्षिण आफ्रिकेसाठी वन डे, कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये खेळत आहे, असे त्याने या व्हिडिओमध्ये नमूद केले.
वन डे आणि टी-20 मध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी अगोदरपासूनच डिव्हिलियर्स कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचं प्रतिनिधित्व करत नाही. डिव्हिलियर्सने 106 कसोटी, 222 वन डे आणि 76 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत त्याने 53.74 च्या स्ट्राईक रेटने 8074 धावा केल्या आहेत. तर वन डेमध्ये 9 हजार 319 धावा त्याच्या नावावर आहेत. शिवाय टी-20 मध्येही त्याच्या खात्यात 1603 धावा जमा आहेत.