मस्कत : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या उत्कृष्ट स्वभावगुणांचे कौतुक केले आहे. धोनीसारखा शांत आणि संयमी भारतीय कर्णधार आपण यापूर्वी पाहिला नव्हता, असे शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, ‘माझ्याकडे आजही धोनीचा फोन नंबर नाही. धोनीने ठरवलेतर तो अनेक दिवस मोबाईल न वापरता राहू शकतो. मी कधीच त्याला त्याचा फोन नंबर मागितला नाही. तो स्वत: सोबत फोन घेऊन फिरत नाही. तो फारच प्रेमळ आणि शांत आहे,’
टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीसोबत रवी शास्त्री यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. सामन्याचा निकाल काहीही लागला तरी तो फार निराश किंवा आनंदी होत नाही. मी त्याला कधीच फार संतापलेल्या अवस्थेत पाहिलेले नाही. सामन्यांच्या निकालाचा त्याच्यावर नकारात्मक परिणाम होत नाही. तो शून्यावर बाद झाला काय किंवा त्याने शतक ठोकले काय, किंवा तो विश्वचषक जिंकला असेल अथवा पहिल्याच फेरीत बाहेर पडला असेल तरी त्याच्यावर याचा परिणाम होत नाही. मी अनेक क्रिकेटपटू पाहिलेत पण त्याच्यासारखे कोणीही नाही. सचिन तेंडुलकरही फार संयमी आहे पण तो कधीकधी रागावतो. मात्र धोनीचे असे नाही,’ असे शास्त्रींनी शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलवर मुलाखतीदरम्यान सांगितले.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्ट २०२० रोजी निवृत्ती घेतली. मात्र तो आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळत आहे. चेन्नईने २०२२ च्या आयपीएल लिलावाआधी रिटेन केलेल्या चार खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे.
बुमराह कर्णधार बनू शकणार नाही!भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार कोण? माजी कोच रवी शास्त्री यांनी यावर तडक उत्तर दिले, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कर्णधारपद देण्यात येऊ नये. मी तसा विचारही करू शकणार नाही. आमच्याकडे नेतृत्वासाठी अनेक पर्याय आहेत. भारतात वेगवान गोलंदाजांकडे नेतृत्व सोपविणे अडचणीचे होईल.