नवी दिल्ली : प्रत्येक खेळाडूची एक खास शैली ठरलेली असते. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचीही एक खास शैली आहे. धोनी विजयी षटकार लगावून सामन्याला पूर्णविराम लावतो, हे सारे आपण पाहिले आहे. पण धोनी हे असे का करतो, हे मात्र जास्त जणांना माहिती नाही. पण दस्तुरखुद्द धोनीनेच हे रहस्य जाहीर केले आहे. त्याचा विजयी षटकार मारण्याचा नेमका काय फंडा आहे, ते जाणून घेऊया...
वानखेडेवर 2011 साली क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात धोनीने षटकार लगावला आणि भारताने विश्वचषकाला गवसणी घातली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामधला सामनाही तुम्हाला आठवत असेल. या सामन्यातही धोनीने विजयी षटकार लगावत चेन्नईला सामना जिंकवून दिला होता. चेन्नईच्या या विजयासह पंजाबचे आयपीएलमधले आव्हानही संपुष्टात आले होते.
पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीला याबाबतीत एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना धोनी म्हणाला की, " जेव्हा सामना रंगतदार अवस्थेत असतो आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला फार कमी धावा विजयासाठी हव्या असतात, तेव्हा प्रत्येक धावा वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करत असलेला संघ करत असतो. त्यावेळी बऱ्याच क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवरून खेळपट्टीच्या जवळ आणले जाते. त्यावेळी जर तुम्ही जमिनीलगत फटके लगावले तर चेंडू थेट क्षेत्ररक्षकांच्या हातात जाऊ शकतो. त्यावेळी या क्षेत्ररक्षकांवरून चेंडू टोलावणे गरजेचे असते. त्यामुळेच मी अशावेळी षटकार लगावण्याचा प्रयत्न करत असतो. "