नवी दिल्ली : वन-डे आणि टी-20 सारख्या मर्यादित षटकांच्या सामन्यात कोणीही महेंद्रसिंग धोनीची जागा घेऊ शकत नाही. त्याच्यासारखा चपळ यष्टीरक्षक सध्या तरी दुसरा कोणीच नाही, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार एम.एस धोनीचं कौतुक केलं आहे. सध्या कोहली आणि धोनी सुट्टीचा आनंद घेत आहेत. पुढील महिन्यापासून आयपीएलमध्ये ते खेळणार आहेत.
मर्यादित षटकांमध्ये धोनीला तोड नाही हे विराट कोहलीचे धोनीबद्दलचे मत बीसीसीआयच्या प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी उघड केलं आहे. विराट कोहली आणि धोनी यांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे. या आजी-माजी कर्णधारांमध्ये उत्तम समन्वय आहे. धोनीचा अनुभव, क्रिकेटबद्दलची समज या सगळ्याचा विराट आदर करतो. तर, अल्पावधीत विराट कोहलीनं मिळविलेल्या यशाचं धोनीला प्रचंड कौतुक वाटतं, विनोद असं राय यांनी सांगितलं. केवळ अनुभवच नाही तर धोनीचं यष्टीमागचं कौशल्य हे भारतीय संघाचं बलस्थान आहे, असं कोहलीचं मत असल्याचं राय यांनी सांगितलं.