Join us  

पंचासोबत वाद घातल्याने धोनीला दंड

नो बॉलवरून ‘राडा’: ‘कॅप्टन कूल’चे रूद्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 5:16 AM

Open in App

जयपूर: चाहत्यांमध्ये ‘कॅप्टन कूल’ नावाने परिचित असलेल्या महेंद्रसिंग धोनीचे गुरुवारी जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात राजस्थान रॉयल्सविरुद्ध रौद्र रूप पहायला मिळाले. धोनीने बाद झाल्यानंतर ‘नो बॉल’वरून झालेल्या वादावरून थेट डगआऊटमधून मैदानात येत पंच उल्हास गंधे यांच्याशी वाद घातला. या वादाचा परिणाम म्हणून आयपीएलने धोनीवर कारवाई केली. धोनीला सामन्यातून मिळणाऱ्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम कापले जाणार आहे. यासंदर्भात आयपीएलकडून रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. आयपीएलच्या नियमानुसार धोनीने लेव्हल दोनमधील २.२० या नियमांमध्ये बसणारी चूक केली असून धोनीने आपली चूक आणि शिक्षा मान्य केल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

आयपीएलच्या २.२० नियमानुसार खेळ भावनेला धक्का पोहचविणाºया खेळाडूवर कारवाई होते. धोनीला करण्यात आलेला ५० टक्के मानधनाचा दंड हा लेव्हल टू चे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिल्यांदा दोषी आढळल्यास करण्यात येणारा कमाल स्वरूपातील दंड आहे.

मैदानात नेमके घडले काय...अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता असताना, फुलटॉस चेंडूवर पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. मात्र यानंतर दुसरे पंच ब्रुस आॅक्सनफर्ड यांनी तो चेंडू नो-बॉल नसल्याचे जाहीर केले. हा प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या धोनीचा संयम सुटला. त्याने मैदानात येऊन पंचांसोबत राडा केला. लेग अम्पायर उल्हास गंधे यांनी बेन स्टोक्सने टाकलेला फुलटॉस चेंडू नो-बॉल असल्याचे घोषित केले. मात्र दुसरे पंच ब्रुस आॅक्सनफर्ड यांनी हा चेंडू नो-बॉल नसल्याचे स्पष्ट केले. गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा सर्वांनी पाहिला होता, तरीही मुख्य पंचांनी हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.

फ्लेमिंगने केला बचाव‘मैदानात येऊन पंचांसोबत वाद घातल्याप्रकरणी महेंद्रसिंग धोनीवर टीकेचा भडीमार होईल,’ अशी कबुली देत चेन्नई सुपरकिंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी ‘तो केवळ स्पष्टीकरण मागत होता,’ असे सांगून कर्णधाराचा बचाव केला. सामन्यानंतर फ्लेमिंग म्हणाले, ‘नो बॉल’ चा निर्णय दिल्यानंतर तो मागे का घेण्यात आला, यावरून धोनी नाराज होता. याबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी माही मैदानात आला होता. त्याचप्रमाणे, ‘खेळपट्टीवर जात पंचासोबत वाद घालणे कर्णधाराला शोभत नाही,’ अशी प्रतिक्रिया देत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, आॅस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्क वॉ, माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्रा व हेमांग बदानी यांनी धोनीवर टीका केली आहे.

टॅग्स :आयपीएल 2019