नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीने बुधवारी रात्री यूएईमध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला. यावेळी लक्षवेधी निवड ठरली ती माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची. खेळाडू म्हणून नाही, तर संघाचा मार्गदर्शक म्हणून धोनी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघासोबत जाईल.
यूएई व ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगेल. बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले की, ‘या स्पर्धेसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शन (मेंटॉर) असेल. मी त्याच्याशी दुबईत चर्चा केली होती. त्याने केवळ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मार्गदर्शक राहण्यास सहमती दर्शवली. याबाबत कर्णधार व उपकर्णधारांनीही सहमती दर्शवली आहे.’ अद्याप कर्णधार म्हणून कोहलीला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा जिंकण्याचा दांडगा अनुभव असलेल्या धोनीच्या अनुभवाचा फायदा कोहलीला होईल. धोनी सध्या यूएईमध्ये चेन्नई सुपरकिंग्जसोबत आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे.
धवन, पृथ्वी शॉ यांना डच्चूआयपीएलमध्ये प्रभावी प्रदर्शन केल्यानंतरही अनुभवी शिखर धवन आणि युवा पृथ्वी शॉ या फलंदाजांना विश्वचषक स्पर्धेसाठी डावलण्यात आले. आयपीएलमध्ये दोघांनी दिल्ली कॅपिटल्सकडून दमदार सलामी दिली होती. श्रीलंका दौऱ्यात धवनने आपल्या अनुभवाच्या जोरावर संयम आणि आक्रमणाचा ताळमेळ साधताना शानदार फलंदाजी केली होती. अनुभवाच्या जोरावर धवन संघात स्थान मिळवेल अशी शक्यता होती. मात्र त्याची न झालेली निवड धक्कादायक ठरली. त्याचप्रमाणे ‘कुलचा’ नावाने फेमस असलेल्या युझवेंद्र चहल, कुलदीप यादव या फिरकी जोडीलाही संघाबाहेर जावे लागले.
धोनीनंतर लक्ष वेधले ते स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अद्याप संधी न मिळालेल्या अश्विनवर निवड समितीने मोठा विश्वास दाखवला. त्याचवेळी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अनुभवी शिखर धवन व पृथ्वी शॉ यांना संघात स्थान मिळालेले नाही. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
मिळणार ‘कूल’ मार्गदर्शनगेल्यावर्षी १५ ऑगस्ट क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा भारतीय संघासोबत दिसेल. यावेळी तो संघाचा मार्गदर्शक म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सहकार्य करेल. धोनीच्या नेतृत्त्वात अनेक खेळाडूंची कारकिर्द बहरली असल्याने, धोनीचे मार्गदर्शन भारतीय संघासाठी दडपणाच्या स्थितीत अत्यंत मोलाचे ठरेल.