नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी, हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार. पण विराट कोहलीने कर्णधारपद स्वीकारल्यावर मात्र धोनी संघात राहणार की नाही, यावर चर्चा व्हायला सुरुवात झाली. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीवर निशाणाही साधला होता. पण संघातील सर्वात फिट व अनुभवी खेळाडू असलेल्या धोनीने आपल्या कामगिरीच्या जोरावर आपल्यावरील टीकेला सडेतोड उत्तर दिले. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर आता धोनीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
धोनीचे संघातील संस्थान खालसा झाल्यावर, कोहलीने काही खेळाडूंना आपल्या गटात सामील केले. आपल्या आवडीचा संघ बांधला. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदी आणण्यासाठी कोहलीने बीसीसीआयलाही झुकवले. त्यादरम्यान धोनीचे संघातील स्थान धोक्यात आल्याचे म्हटले जात होते. पण धोनीने संघातील आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आणि हे स्थान टिकवलेदेखील. आता शास्त्रीदेखील धोनीची स्तुती करताना दिसत आहेत. धोनी हा क्रिकेट विश्वातील महान क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे असलेल्या अनुभवाची तुलना करता येणारच नाही. क्रिकेटविश्वाने अनुभवलेला तो सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याचा फिटनेस कमालीचा आहे. त्याचा अनुभव नेहमीच संघासाठी मोलाचा ठरत आहे, असे शास्त्री यांनी धोनीबाबत सांगितले आहे.
भारताचे माजी विश्वविजयची कर्णधार कपिल देव आणि माजी कर्णधार सैारव गांगुली यांनीही शुक्रवारी धोनीची स्तुती केली होती. शास्त्री यांनी धोनीच्या फलंदाजीचेही यावेळी कौतुक केले आहे. धोनी हा चांगला फिनीशर आहे. अखेरच्या षटकांमध्ये कशी फलंदाजी करावी, हे त्याच्याएवढे कुणालाही माहिती नसावे. 5 ते 7 या क्रमांकावर तुमच्याकडे धोनीसारखा खेळाडू असेल तर ते नक्कीच पथ्यावर पडते, असे शास्त्री म्हणाले.