नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी या आयपीएलमध्ये तळातील क्रमांकावर फलंदाजीला येत आहे. रविवारी पंजाबविरुद्ध १२२ धावांवर सहा गडी बाद झाल्यावर सर्वांनाच धोनी फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल, असे वाटले; पण तसे झाले नाही. धोनीच्या जागी शार्दुल ठाकूर मैदानावर उतरला. धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. धोनीच्या या निर्णयानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली. पण, आता याबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
धोनी यंदाच्या आयपीएल सत्रात पायाच्या मांसपेशींच्या दुखापतीशी लढा देत आहे. यामुळे त्याची धावण्याची क्षमता कमी झाली आहे. वरच्या फळीत फलंदाजी करणे कठीण होते. तेथे धावणे आवश्यक असते. डाॅक्टरांनी धोनीला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण, चेन्नईचा संघ खेळाडू जखमी झाल्याने कमकुवत झाला आहे.
अतिरिक्त यष्टिरक्षक डेवन काॅन्वे हादेखील दुखापतीमुळे न्यूझीलंडवरून परतलेला नाही. त्यामुळेच धोनी स्वत:ला विश्रांती देण्याबाबत विचार करत नाही. धोनी उपचारांसोबतच दुखापतीचे व्यवस्थापन करत आहे. त्यामुळेच तो धावण्यापेक्षा मोठे फटके खेळण्यावर भर देत आहे.सूत्रांनी सांगितले की, आम्ही आमच्या ब संघासोबत खेळत आहोत. जे लोक धोनीवर टीका करत आहेत त्यांना माहिती नाही की धोनी संघासाठी किती मोठा त्याग करत आहे. डाॅक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण, तरीही यष्टिरक्षक-फलंदाजाचा कोणताही पर्याय नसल्यामुळे धोनी खेळत आहे. सरावादरम्यानही धोनी अजिबात पळत नाही आणि चेंडू मैदानाबाहेर मारण्यावर तो भर देत आहे. तो नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी मार्गदर्शक आहे. गायकवाडने खूप चांगली कामगिरी केली आहे. दुखापतीमुळे मथीषा पथीराणा आणि दीपक चाहर स्पर्धेबाहेर झाले आहेत.