ठळक मुद्देएकदिवसीय संघात रिषभ पंत या युवा यष्टीरक्षकाला संधी देऊन धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई : आगामी विश्वचषकात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. कारण भारतीय ट्वेन्टी-20 संघातून धोनीला डच्चू देण्यात आला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय संघात रिषभ पंत या युवा यष्टीरक्षकाला संधी देऊन धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनी आगामी विश्वचषकात दिसणार की नाही, याबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र या प्रश्नावर चोख उत्तर दिले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पुण्यात खेळवण्यात आला. या सामन्यापूर्वी भारतीय ट्वेन्टी-20 संघाची घोषणा करण्यात आली. या संघातून धोनीला वगळण्यात आले. या गोष्टीचा विपरीत परिणाम धोनीवर होईल, असे वाटले होते. पण धोनीने या सामन्यात एक अफलातून झेल टिपला आणि निवड समितीच्या घशात दात घातले.
गावस्कर यांनी सांगितले की, " धोनी हा काही भारताचा कर्णधार नाही. विराट कोहली हा भारताचा कर्णधार आहे. पण तरीदेखील धोनीची संघाला गरज आहे. मला ही गोष्ट मान्य आहे की, गेल्या वर्षभरात धोनीला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. पण धोनीकडे जास्त अनुभव आहे आणि सामन्याचे पारडे बदलण्याची क्षमता आहे. कोणत्या खेळाडूला कधी संधी द्यायची, याचे धोनीकडे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे भारताला जर विश्वचषक जिंकायचा असेल तर धोनी संघात असायलाच हवा. "
Web Title: Dhoni is not captain, though Kohli is the captain; Sunil Gavaskar's straight drive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.