मुंबई : भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द गाजवली. दोन दशकांहून अधिक क्रिकेट कारकिर्दीत त्याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. त्याने अनेक कर्णधारांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचाही समावेश आहे, परंतु सर्वोत्तम कर्णधार म्हणून त्याने निवडलेला खेळाडू पाहून आश्चर्य वाटेल.
मोहम्मद अझरुद्दीन हा कुंबळेचा फेव्हरिट कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वकौशल्याने कुंबळे प्रचंड प्रभावीत झाला होता. अझरुद्दीनने 47 कसोटी आणि 174 वन डे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याने 90 वन डे सामन्यांत भारताला विजय मिळवून दिले आणि 2014 मध्ये हा विक्रम महेंद्रसिंग धोनीने मोडला. फेव्हरिट कर्णधार म्हणून अझरुद्दीनची निवड केली असली तरी पत्नी महेंद्रसिंग धोनीची फॅन असल्याचेही कुंबळे सांगायला विसरला नाही. कुंबळे म्हणाला,'' माझी पत्नी धोनीची फॅन आहे. जेव्हा जेव्हा तो भेटतो, ती त्याच्यासोबत फोटो काढायला विसरत नाही."
कुंबळेने 1990 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 132 कसोटी सामन्यातं 619 विकेट घेतल्या आहेत. तो मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यापाठोपाठ सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 271 वन डे सामन्यांत कुंबळेच्या नावावर 4.30 च्या सरासरीने 337 विकेट जमा आहेत. 1999 मध्ये त्याने कसोटी सामन्यांत एका डावात दहा विकेट टिपण्याचा पराक्रम केला होता आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज होता.