"धोनीसोबतच्या चर्चेतून नेहमीच मदत मिळायची. विशेषत: दबावात कसं खेळायचं हे मी त्याच्याकडून शिकलो", असं म्हणत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची पिसं काढणाऱ्या मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी विजय प्राप्त केल्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला आहे. भारतीय संघाचं जोरदार स्वागत यावेळी करण्यात आलं. शार्दुल ठाकूरचंही त्याच्या घरी मोठ्या थाटात औक्षण करुन स्वागत करण्यात आलं. शार्दुलने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आवर्जुन उल्लेख केला.
"धोनीने एक खेळाडू, कर्णधार आणि पराभूत संघाचा सदस्य म्हणून दबावात्मक परिस्थितीचा सामना केला आहे. विजयानंतर त्याला मिळणारं प्रेमही मी अनुभवलं आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे. त्यामुळे दबावात कसा खेळ करायचा या विषयावर मी धोनीसोबत अधिक वेळ चर्चा करायचो", असं शार्दुल म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी मिळाली होती. या संधीचं सोनं करत शार्दुलनं महत्वाची खेळी केली. शार्दुलने २ डावांमध्ये ७ विकेट्स तर घेतल्याच पण त्यानं आपल्या फलंदाजीचं कौशल्यही यावेळी दाखवून दिलं. वॉशिंग्टन सुंदरसह पहिल्या डावात ७ विकेटसाठी त्याने १२३ धावांची निर्णायक भागीदारी केली होती. शार्दुलने लगावलेले खणखणीत षटकार डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. ऑस्ट्रेलियातील कामगिरीचं श्रेय तो संपूर्ण संघाला देतो. यासोबतच आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात मिळालेल्या सल्ल्याचं चिज झाल्याचंही त्यानं सांगितलं.
८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा
"आमच्यासारख्या नवख्या खेळाडूंना धोनीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. धोनी आम्हाला त्याचे अनुभव सांगतो तेव्हा ते आम्ही फक्त ऐकत असतो. कारण त्यातून आम्हाला रोज काहीना काही नवं मिळत असतं. जर तुम्ही हुशार असाल तर धोनीच्या सल्ल्यांमधून खूप काही शिकाल", असं शार्दुल ठाकूर म्हणाला.