चेन्नई, दि. 17 - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला 282 धावांचं आव्हान दिलं आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली असून डकवर्थ लुइस नियमानुसार कांगारूंना 21 ओव्हरमध्ये 164 धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे. भारताच्या डावात महेंद्रसिंग धोनीने (79) आणि हार्दिक पांड्याने (83) धावांची शानदार खेळी केली. दोघांनी केलेल्या 118 धावांच्या शतकी भागीदारीमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
या सामन्यात धोनीने आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. धोनीने 88 चेंडूंमध्ये केलेल्या 79 धावांच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार फटकावले आणि वनडे कारकिर्दितील 66 वं अर्धशतक पूर्ण केलं. यासोबत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचं शतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 33 अर्धशतक आणि टी-20 क्रिकेटमध्ये एकमेव अर्धशतक आहे. यासोबत धोनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचं शतक करणारा चौथा फलंदाज बनला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली आहे.
धोनी सामिल होणार दिग्गजांच्या यादीत, असा पराक्रम करणारा होणार चौथा भारतीय-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टम्पिंगचे शतक करण्याचा विक्रम केल्यानंतर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याला आणखी एक विक्रम खुणावतोय. आजपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो या विक्रमाला गवसणी घालू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेत धोनीने आतापर्यंत 52.20 च्या सरासरीने 9658 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दहा हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. या मालिकेत धोनीने 342 धावा केल्यास तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांच्या पंक्तीत विराजमान होईल.
भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा धोनीच्या नावावर आहे. एवढेच नाही तर कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणारा धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. या सामन्यांमध्ये दोन शतकांच्या मदतीने त्याने 1204 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची ही कामगिरी आणि सध्याचा त्याता फॉर्म पाहता आगामी मालिकेत दहा हजार धावांचा टप्पा गाठणे अवघड नाही.
36 वर्षीय धोनी आज चेन्नई येथे कारकिर्दीतील 302 वा सामना खेळणार आहे. सध्या धोनीच्या नावावर 301 वनडे सामन्यात 52.20 च्या सरासरीने 9658 धावा आहेत. त्याने जर या मालिकेत 342 धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ 12 वा खेळाडू बनणार आहे. धोनीने वनडे कारकिर्दीत 10 शतके आणि 65 अर्धशतके केली असून नाबाद 183 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.
यांनी वनडेत पार केला आहे 10 हजारांचा टप्पा
1. सचिन तेंडुलकर - 18,426 runs (463 सामने)2. कुमार संगकारा - 14,234 (404)3. रिकी पॉन्टिंग - 13,704 (375)4. सनाथ जयसूर्या - 13,430 (445)5. माहेला जयवर्धने- 12,650 (448)6. इंझमाम उल हक- 11,739 (378)7. जॅक कॅलिस - 11,579 (328)8. सौरव गांगुली - 11,363 (311)9. राहुल द्रविड- 10,889 (344)10. ब्रायन लारा- 10,405 (299)11. तिलकरत्ने दिलशान- 10,290 (330)