Join us  

केवळ फलंदाज म्हणून धोनीकडे पाहू नये

महेंद्रसिंग धोनीने पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत त्याचे संघातील स्थान निश्चित आहे यावर मी सुरुवातीपासून ठाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:05 AM

Open in App

- अयाझ मेमनमहेंद्रसिंग धोनीने पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत त्याचे संघातील स्थान निश्चित आहे यावर मी सुरुवातीपासून ठाम होतो. मध्यंतरी त्याच्या ढासळलेल्या कामगिरीमुळे विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला संघात घ्यावे की नाही यावर चर्चा सुरु होती. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: धोनीच आपल्या खेळीतून देत आहे. त्याने आॅस्टेÑलियात चांगल्या यष्टीरक्षणासह फलंदाजीतही छाप पाडली. यानंतर घरच्या मैदानावर भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.तरी पूर्वीप्रमाणे सामना संपवण्याची ताकद आता त्याच्यात फारशी दिसणार नाही. कारण आता त्याचे वय वाढले आणि ज्याप्रमाणे एक खेळाडू आपल्या उमेदीच्या काळात खेळायचा त्याच प्रमाणे तो अखेरपर्यंत खेळेल असे नसते. त्यामुळेच जुन्या स्थानांसाठी नव्या खेळाडूंचा शोध घ्यावाच लागतो. सध्या ‘फिनिशर’साठी आपल्या अनेक चांगले पर्याय आहेत. यात ॠषभ पंत, केदार जाधव आघाडीवर आहे.धोनीवर आता वेगळी जबाबदारी आहे. तो खेळपट्टीवर एक बाजू लावून धरेल आणि त्याचा सहकारी फलंदाज फटकेबाजी करेल. जेणेकरुन भारताचा डाव कोसळणार नाही. पहिल्या सामन्यात त्याने ‘गेम सेन्स’ दाखवला. नवखा खेळाडू आपला नैसर्गिक खेळ करुन निघून जातो, पण अनुभवी खेळाडू परिस्थितीनुसार खेळी करतो आणि हेच धोनीने केले. धोनीने पहिल्या सामन्यातील जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली, पण त्याचबरोबर केदार जाधवलाही चांगल्याप्रकारे सांभाळून घेतले. त्यामुळेच धोनी संघातील अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू ठरतो. याशिवाय तो सध्या कर्णधार नाही, मात्र धोनीचे ‘क्रिकेट माइंड’ जबरदस्त असून त्याला तोड नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात कर्णधार कोहली नेहमी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दिसतो. याचे कारण म्हणजे कोहलीलाही विश्वास आहे की, धोनी सामन्यातील सर्व परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.

(संपादकीय सल्लागार)

टॅग्स :अयाझ मेमन