नवी दिल्ली : ‘सर्व खेळाडू सुखरूप मायदेशी परतल्यानंतरच मी रांचीसाठी रवाना होणाऱ्या विमानात बसणार आहे,’ असा स्पष्ट संदेश चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रिसंग धोनी याने गुरुवारी संघ व्यवस्थापनाला पाठविला. धोनीच्या या निर्णयाचे चाहत्यांनी स्वागत केले असून त्याच्या कृतीची प्रशंसा होत आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मंगळवारी आयपीएल सामने स्थगित झाले होते.
‘आपल्याआधी परदेशातून आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या खेळाडूंची आणि त्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या संघातील सहकाऱ्यांची घरी जाण्याची व्यवस्था करावी. मी सर्वजण गेल्यानंतरच इथून निघणार आहे,’ असे धोनीने म्हटले आहे.
संघ सहकाऱ्यांबरोबर नुकतीच धोनीने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बैठक घेतली. आयपीएल भारतामध्येच होत असल्याने परदेशातून आलेल्या खेळाडूंना आणि सपोर्टिंग स्टाफला घरी जाण्यासाठी आपण सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे. त्यानंतर भारतीय खेळाडूंची व्यवस्था करण्यात यावी, असे त्याने या बैठकीत सांगितले.
‘हे हॉटेल सोडणारा मी सीएसकेचा शेवटचा खेळाडू असेल, असे माहीभाईने आम्हाला सांगितले. तो गुरुवारी सायंकाळी रांचीसाठी रवाना झाला आहे. सर्व खेळाडू सुखरूप घरी पोहचल्यानंतरच तो निघणार आहे,’ अशी माहिती सीएसकेच्या एका खेळाडूने दिली.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आपल्या परदेशी खेळाडूंना मायदेशी पाठवण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली. दिल्ली विमानतळावरून दहा आसन व्यवस्था असलेली विमाने राजकोट आणि मुंबईसाठी गुरुवारी सकाळी रवाना झाली. सायंकाळी निघणाऱ्या विमानांनी मुंबई आणि बंगळुरूमधील खेळाडूंना सोडण्यात येणार आहे.
Web Title: 'Dhoni is smart off the field'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.