Join us  

धोनी म्हणजे ‘नव्या भारताचा आत्मा’...

खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावे, हेदेखील समजते.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 2:51 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘धोनी तुझ्यात नव्या भारताचा आत्मा दिसतो. 'न्यू इंडिया' मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबीयांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ आॅगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हिडीओ बरेच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावे, हेदेखील समजते.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे.संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना महेंद्रसिंग धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करत १५ आॅगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिले आहे. धोनीनेच टिष्ट्वटरवरुन हे पत्र शेअर केले आहे.मोदी यांनी लिहिले,’१५ आॅगस्ट रोजी तू तुझ्या ‘ट्रेडमार्क स्टाईल’मध्ये म्हणजेच अनपेक्षितपणे एक लहान व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरुन देशभरात चर्चा सुरू झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत.विश्वचषकातील शेवटचा सामना आणि तुझी ‘फिनिशिंग स्टाईल’ कायम आमच्या स्मरणात राहणार आहे. तुझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीकडे आकडेवारीच्या नजरेने पाहता येईल. तू सर्वात यशस्वी कर्णधार ठरलास. भारताला तू अग्रेसर बनवण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. इतिहासात तुझे नाव सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम कर्णधार आणि या खेळातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नोंदवले जाईल. कठीण प्रसंगी तुझ्यावर निर्भर राहणे आणि सामना संपवण्याची तुझी शैली खास करुन २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सर्वसामान्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. तो पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील.’खेळाबरोबरच धोनीकडे त्याच्या खडतर प्रवासासाठी आणि प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाईल असेही मोदींनी म्हटले आहे.‘महेंद्रसिंग धोनी हे नाव केवळ खेळातील आकडेवारी आणि सामना जिंकण्याच्या शैलीसाठी लक्षात राहणार नाही. तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. तुझे योगदान हे आश्चर्यचकित करणारे आहे असेच म्हणता येईल. एका लहान शहरामधून सुरुवात करीत तू राष्ट्रीय पातळीवर आला आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि महत्त्वाचे म्हणजे भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीस. तुझी प्रगती आणि कामगिरी ही करोडो भारतीय तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तुझ्याप्रमाणे ते अगदी नावाजलेल्या शाळा, कॉलेजांमध्ये गेले नाहीत. त्यांचे कुटुंबही जास्त प्रभावशाली कुटुंबांपैकी नाही मात्र आपल्यामधील कौशल्याच्या जोरावर त्यांनी तुझ्याप्रमाणे यश मिळवले आहे,अशांसाठी तू प्रेरणास्थान आहेस. तू तरुण भारताचा खरा चेहरा आहेस. ज्या भारतामध्ये तुमचे आडनाव आणि कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे यावर त्यांचा प्रवास ठरत नाही तर तरुण स्वत: त्यांची ओळख निर्माण करुन वाटचाल करतात. आपण कुठून आलो आहोत यापेक्षा कुठे चाललो आहोत हे अधिक महत्त्वाचे असते याच नियमानुसार तू अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहेस,’ असे मोदींनी या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महेंद्रसिंग धोनीला भविष्याबाबत शुभेच्छा देत, ‘आता पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा यांच्यासोबत अधिक वेळ घालवता येईल,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. (वृत्तसंस्था)>धोनीने मानले आभार...‘कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाची आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे असे त्यांना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद,’ असे म्हणत धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र टिष्ट्वट केले आणि त्यांचे आभारही मानले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीनरेंद्र मोदी