नवी दिल्ली : विश्वकप विजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २००७ मध्ये ज्यावेळी आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यावेळी तो आपल्या गोलंदाजांवर नियंत्रण राखण्यास प्राधान्य देत होता. पण २०१३ पासून त्याने त्यांच्यावर विश्वास दाखविण्यास सुरुवात केली आणि याच कालावधीत तो कॅप्टन कूल झाला, असे मत भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने व्यक्त केले. पठाण २००७ विश्वकप विजेता संघ आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता आणि धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल होता.
हा ३५ वर्षीय खेळाडू स्टार स्पोर्ट््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड‘शोदरम्यान म्हणाला,‘२००७ मध्ये प्रथमच धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. प्रतिष्ठेच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर उत्साह असणे स्वाभाविक आहे. पण संघाची बैठक मात्र नेहमीच कमी वेळेची असायची. २००७ मध्ये आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफीदरम्यानही संघाची बैठक केवळ ५ मिनिटांची असायची.’ पठाण पुढे म्हणाला, २०१३ पर्यंत धोनीने सामना जिंकण्यासाठी अडचणीच्या स्थितीत फिरकीपटूंना पाचारण करण्यास सुरुवात केली होती. २००७ आणि २०१३ दरम्यान धोनीने फिरकीपटूंवर विश्वास दाखविण्याचा अनुभव मिळविला होता. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन झाले. त्यावेळी मोक्याच्या क्षणी सामना जिंकण्यासाठी फिरकीपटूला पाचारण करण्याची त्याची रणनीती स्पष्ट झाली होती.
‘२००७ मध्ये धोनी यष्टिरक्षण करीत असताना उत्साहाच्या भरात गोलंदाजीच्या एन्डपर्यंत धावत असल्याचे दिसत होते आणि त्याचसोबत गोलंदाजांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असायचा. पण २०१३ मध्ये तो स्वत: गोलंदाजांना नियंत्रण करू देत होता. तो शांत झाला होता.’ -इरफान पठाण
Web Title: Dhoni started believing in bowlers from 2013 - Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.