ठळक मुद्देकपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळालीएका जाहिरातीच्या शुटिंगसाठी हे दोघे विश्वविजेचे कर्णधार एकत्र आले होतेयावेळी कपिल देव यांनी टाकलेल्या एका बाऊन्सरने धोनीला आश्चर्यचकित केलं
कोलकाता - भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे दोन्ही कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळाली. गुरुवारी दोन्ही दिग्गज मैदानावर एकत्र क्रिकेट खेळत होते. हा कोणताही क्रिकेट सामना नव्हता, तर एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी हे दोघे विश्वविजेचे कर्णधार एकत्र आले होते. पण यावेळी कपिल देव यांनी टाकलेल्या एका बाऊन्सरने धोनीला आश्चर्यचकित केलं. मैदानातच जवळपास 30 सेकंदाच्या सीनचे शुटिंग करण्यात आले. याचं दिग्दर्शन बंगाली निर्माता आणि दिग्दर्शक अरिंदम सिल यांनी केलं.
शुटिंगच्या वेळी दोन्ही खेळाडूंनी संपुर्ण वेळ फक्त क्रिकेट खेळण्यात घालवला. यावेळी आधी कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनीसाठी गोलंदाजी केली. नंतर भूमिका बदलत धोनीने 1983 चा वर्ल्डकप जिंकून देणा-या कपिल देव यांना गोलंदाजी केली. यावेळी 2003 साली भारतीय संघाला वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत पोहोचवणारा माजी कर्णधार सौरभ गांगुलीही उपस्थित होता. यावेळी धोनी आणि कपिल देव यांनी खेळपट्टीची पाहणीही केली. भारत आणि श्रीलंकादरम्यान पहिला कसोटी सामना याच मैदानावर खेळला जाणार आहे. 16 नोव्हेंबरला पहिला सामना होणार आहे.
दिग्दर्शक अरिंदम यांनी आपल्यासाठी हे जाहिरातीचं शुटिंग म्हणजे लाइफटाइम अनुभव होता असं सांगितलं. 'दोन्ही वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांसोबत ईडन गार्डन्सच्या मैदानात जाहिरात शूट करुन फार आनंद मिळाला आहे. हा क्रिकेटचा मक्का असून, शुटिंगसाठी माझ्याकडे दोन्ही कर्णधार होते. हा माझ्या आयुष्यातील न विसरण्याजोगा क्षण आहे. दोघेही सर्वोत्कृष्ट कर्णधार आहेत. मी दोघांनाही या मैदानावर खेळताना पाहिलं आहे. पण त्यांच्यासोबत शूट करणं हा अनुभव शब्दात व्यक्त करणं कठीण आहे', असं अरिंदम यांनी सांगितलं.
कसोटी विजयाचे शतक गाठण्याची भारताला संधी
न्यूझीलंडला एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पराभूत केल्यानंतर भारत आता श्रीलंकेशी भिडणार आहे. 16 नोव्हेंबरला कोलकातामध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. या कसोटी मालिकेत एक शानदार रेकॉर्ड करण्याची संधी भारताकडे आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ‘क्लीन स्वीप’ केल्यास मायदेशात कसोटी विजयाचे शतक साजरे होणार आहे. ही कामगिरी करणारा भारत तिसरा देश ठरेल. इतकेच नव्हे तर विराट कोहली देखील सर्वांत यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुस-या स्थानावर विराजमान होईल.
Web Title: Dhoni was shocked to see the bouncer by Kapil Dev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.