Join us  

धोनीने साकारला भारताचा धमा‘केदार’ मालिका विजय

पहिल्यांदाच जिंकली एकदिवसीय मालिका : भारताने आॅसीला २-१ ने नमविले; युझवेंद्र चहलने घेतले ६ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:28 AM

Open in App

मेलबर्न : युझवेंद्र चहलच्या जादुई फिरकी पाठोपाठ ‘मॅच फिनिशर’ महेंद्रसिंग धोनी तसेच केदार जाधव यांच्यात चौथ्या गड्यासाठी झालेल्या नाबाद १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने शुक्रवारी तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ७ गड्यांनी धुव्वा उडवून द्विपक्षीय मालिकेत २-१ ने ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला.

कसोटी मालिका जिंकून इतिहास घडविणाºया भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवरही कब्जा केला. याआधी टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. भारताची ही विक्रमी कामगिरी ठरली. तिन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा महेंद्रसिंग धोनी मालिकेचा मानकरी ठरला आहे.

सामनावीर ठरलेल्या युजवेंद्र चहलने ४२ धावांत सहा गडी बाद करत आॅस्ट्रेलियाला ४८.४ षटकांत २३० धावांत गुंडाळले. यानंतर धोनीने आॅस्ट्रेलियन क्षेत्ररक्षणातील उणिवा शोधून एकदिवसीय सामन्यातील ७० वे अर्धशतक ठोकले. शिवाय त्याने केदारसोबत नाबाद शतकी भागीदारी करीत ४९.२ षटकांत ३ बाद २३४ धावा करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

धोनीने ११४ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ८७, तर केदार जाधवने ५७ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६१ धावा केल्या. अखेरच्या चार षटकात ३३ धावांची गरज असताना दोघांनी ४७ व्या षटकात सहा, ४८ व्या षटकात १३ आणि ४९ व्या षटकात १३ धावा वसूल केल्या. त्याचवेळी भारताची सुरुवात मात्र खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा (९) लवकर बाद झाला. शिखर धवन (२३)आणि विराट कोहली (४६) यांनी काही वेळ बाजू सांभाळली. धवन बाद झाल्यानंतर कोहली-धोनी यांचा भारतीय चाहत्यांनी उत्साह वाढविला. दोघांनी ५४ धावांची भागीदारी केली. रिचर्डसनने कोहलीला झेलबाद केले.

याआधी मालिकेत पहिलाच सामना खेळणाºया चहलने सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ६ गडी टिपले. याआधी त्याने द. आफ्रिकेतील सेंच्युरियनमध्ये २२ धावात पाच गडी बाद केले होते. चहलने यावेळी आॅस्ट्रेलियात भारतीय गोलंदाजांच्या सर्वोत्तम कामगिरीशी बरोबरी साधली. याआधी अजित आगरकरने याच मैदानावर २००४ च्या तिरंगी मालिकेत ४२ धावात ६ गडी बाद केले होते. त्याचप्रमाणे येथे विदेशी खेळाडूची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आॅस्ट्रेलियाकडून हँडस्कोम्बने सर्वाधिक ५८ धावा केल्या. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताच खराब हवामानामुळे खेळ दहा मिनिटे उशिरा सुरू झाला. दोन चेंडू पडल्यानंतर पुन्हा हवामानामुळे २० मिनिटांसाठी खेळ थांबला होता. अष्टपैलू विजय शंकर याने या सामन्याद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.(वृत्तसंस्था)टीकाकारांना उत्तर देण्याचा माहीचा हा ‘खास’ अंदाज‘टीकाकारांनी महेंद्रसिंग धोनी संपल्याचे जाहीर केले. तो आता ‘मॅच फिनिशर’ राहिलेला नाही, असेही म्हटले. माहीला मात्र स्वत:च्या क्षमतेवर विश्वास आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॅट’ने चोख उत्तर देत त्याने खरा ‘मॅचफिनिशर’ असल्याचे स्वत:ला सिद्ध केले. टीकेला चोख उत्तर देण्याची धोनीची हीच शैली आहे,’ अशी प्रतिक्रिया धोनीचे पहिले प्रशिक्षक केशवरंजन बॅनर्जी यांनी व्यक्त केली.रांचीच्या जवाहर विद्यामंदिरमध्ये धोनीला फुटबॉलकडून क्रिकेटकडे वळविणारे बॅनर्जी म्हणाले,‘टीका किंवा प्रशंसेवर प्रतिक्रिया देणे धोनीची सवय नाही.’

विश्वचषकाची योग्य तयारी - कोहलीकर्णधार विराट कोहली याने प्रथमच आॅस्ट्रेलियाच्या भूमीत तिन्ही प्रकारात दमदार कामगिरी करणाºया संघातील सहकाºयांचे कौतुक केले. ही विश्वचषकासाठी योग्य तयारी असल्याचे विराटने सांगितले. तो पुढे म्हणाला,‘फलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्टी नसताना आमच्या गोलंदाजांनी प्रशंसनीय कामगिरी केली. पाठोपाठ धोनी आणि केदारने विजयावर कळस चढविला. आमच्यासाठी हा दौरा फारच उपयुक्त ठरला. संघात आत्मविश्वास संचारला असून विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संतुलन साधले आहे.’ सामनावीर ठरेला युझवेंद्र चहल म्हणाला,‘ मी आॅस्ट्रेलियात प्रथमच गोलंदाजीचा आनंद लुटला.’धावफलक

  • आॅस्ट्रेलिया : अ‍ॅलेक्स केरी झे. कोहली. गो. भुवनेश्वर ५, अ‍ॅरोच फिंच पायचित गो. भुवनेश्वर १४, उस्मान ख्वाजा झे. व गो. चहल ३४, शॉन मार्श यष्टिचित गो. चहल ३९, पीटर हँडस्कोम्ब पायचित गो. चहल ५८, मार्कस् स्टोइनिस झे. रोहित गो. चहल १०, ग्लेन मॅक्सवेल झे. भुवनेश्वर गो. शमी २६, झाय रिचर्डसन झे. जाधव गो. चहल १६, अ‍ॅडम झम्पा झे. शंकर गो. चहल ८, पीटर सिडल नाबाद १०, बिली स्टानलेक त्रि. गो. शमी ००. अवांतर : १०. एकूण : ४८.४ षटकांत सर्वबाद २३० धावा.
  • गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-१-२८-२, मोहम्मद शमी ९.४-०-४७-२, विजय शंकर ६-०-२३-०, केदार जाधव ६-०-३५-०; रवींद्र जडेजा ९-०-५३-०, युझवेंद्र चहल १०-०-४२-६.
  • भारत : रोहित शर्मा झे. मार्श गो. सिडल ९, शिखर धवन झे. व गो. स्टोइनिस २३, विराट कोहली झे. केरी गो. रिचर्डसन ४६, महेंद्रसिंग धोनी नाबाद ८७, केदार जाधव नाबाद ६१. अवांतर: ८. एकूण: ४९.२ षटकात ३ बाद २३४ धावा.
  • गोलंदाजी : झाय रिचर्डसन १०-१-२७-१, पिटर सिडल ९-१-५६-१,बिली स्टेनलेक १०-०-४९-०, ग्लेन मॅक्सवेल १-०-७-०, अ‍ॅडम झम्पा १०-०-३४-०, मार्कस स्टोइनिस ९.२-०-६०-१.

 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी