Join us  

धोनीचा सल्ला फायदेशीर; मोठे फटके मारण्यास सांगितले  - कॉन्वे

सलग तिसरे अर्धशतक झळकावलेल्या कॉन्वेने सामन्यानंतर सांगितले की, ‘माझ्या खेळीचे श्रेय धोनीला जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 5:33 AM

Open in App

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जचा आक्रमक सलामीवीर डीवोन कॉन्वे याने आपल्या आक्रमक अर्धशतकाचे श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले. ‘फिरकीपटूंविरुद्ध खेळताना पायांचा चांगल्याप्रकारे वापर करत, मोठे फटके खेळण्याचा सल्ला धोनीने दिला होता. त्याचा दिल्लीविरुद्ध फायदा झाला,’ असे कॉन्वे म्हणाला. कॉन्वेने रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आक्रमक अर्धशतक झळकावताना चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

सलग तिसरे अर्धशतक झळकावलेल्या कॉन्वेने सामन्यानंतर सांगितले की, ‘माझ्या खेळीचे श्रेय धोनीला जाते. मागच्या सामन्यात मी स्वीप फटक्याचा अनेकदा वापर केला आणि याच फटक्यावर बादही झालो होतो. धोनीने मला सांगितले होते की, दिल्लीचे फिरकीपटू माझ्याविरुद्ध फुल लेंथवर मारा करतील. त्यामुळे मला क्रीझ बाहेर येऊन मोठे फटके मारण्याचा सल्ला धोनीने दिला होता. त्यानुसारच मी फलंदाजी केली.’

त्याचप्रमाणे, संघाचे सहायक प्रशिक्षक मायकल हसी यांच्याकडूनही मदत मिळाल्याचे कॉन्वे म्हणाला. त्याने सांगितले की, ‘माझी अनेकदा मायकल हसीसोबत तुलना केली जात असल्याचे मी ऐकले आहे, हे ऐकून चांगलेही वाटते. हसीसारख्या महान खेळाडूसोबत तुलना होणे विशेष गोष्ट ठरते. हसीकडे खेळाची मोठी माहिती आणि अनुभव आहे. केवळ आयपीएलच नाही, तर संपूर्ण क्रिकेटविश्वाची त्याला माहिती आहे.’

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App