भारतीय क्रिकेट संघात धोनी सर्वोत्तम फुटबॉलपटू!

रोहित शर्मा ‘ला लीगा’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:36 AM2019-12-13T03:36:35+5:302019-12-13T06:13:47+5:30

whatsapp join usJoin us
Dhoni's best footballer in Indian cricket team! | भारतीय क्रिकेट संघात धोनी सर्वोत्तम फुटबॉलपटू!

भारतीय क्रिकेट संघात धोनी सर्वोत्तम फुटबॉलपटू!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू चांगल्या प्रकारे फुटबॉल खेळतात. ईशांत शर्मा हा भारतीय संघातील ज्लाटन इब्राहिमोविच आहे. पण नंबर वन फुटबॉलपटू महेंद्रसिंग धोनी आहे,’ असे भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने सांगितले.

रोहितला स्पेनच्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. गुरुवारी मुंबईत ला लीगाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेच्या ९० वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच फुटबॉलव्यतिरिक्त इतर खेळाडूची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड झाली. त्यात हा मान रोहितने मिळवला असल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
या वेळी रोहितने मिळालेल्या सन्मानाबद्दल भारावून गेल्याचे सांगताना ला लीगाचे आभारही मानले. भारतीय क्रिकेट संघ आपल्या सराव सत्रात कायमच फुटबॉल खेळण्यावर भर देतो.

फुटबॉल खेळताना भारतीय क्रिकेटपटू कशा प्रकारे योजना करतात याबाबत रोहित म्हणाला, ‘सराव सत्रात सर्व जण फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतात. या वेळी दोन कर्णधार आपापला संघ निवडतात आणि त्यानुसार खेळाडूंची विभागणी होते. जे खेळाडू उपलब्ध होतात त्यानुसार मध्यरक्षक, आक्रमक, बचावपटू ठरवले जातात. काही चांगले खेळाडू आहेत, जे आक्रमक होतात; पण बचावपटूही महत्त्वाचे असतात. मी प्रत्येक स्थानी खेळलोय, पण मला मध्यरक्षक म्हणून खेळायला आवडते. कारण भारतीय क्रिकेट संघाच्या सराव सत्रातील फुटबॉलमध्ये मध्यरक्षकाचे काम सर्वांत आव्हानात्मक असते. मध्यरक्षकांना खूप धावावे लागते, आक्रमक मात्र चेंडू जवळ येईपर्यंत एका ठिकाणी उभे असतात.’

त्याचप्रमाणे, ‘सर्व खेळाडू आनंद घेतात म्हणून सराव सत्रात फुटबॉल खेळतो. फुटबॉलमुळे सर्व जण एकत्र येतात. खेळाडूंचा उत्साह व त्यांची ऊर्जा कमालीची उंचावते. सामन्याआधी ज्या ऊर्जेची आम्हाला गरज असते ती फुटबॉल खेळल्याने मिळते. त्यामुळेच आम्ही फुटबॉलवर भर देतो,’ असेही रोहित म्हणाला.

भारताचे अनेक क्रिकेटपटू फुटबॉलपटूंना फॉलो करीत असल्याचे सांगताना रोहित म्हणाला, ‘श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या
यांसारखे युवा खेळाडू फुटबॉलपटूंचे चाहते असून त्यांच्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आवडत्या फुटबॉलपटूंप्रमाणे ते हेअरस्टाईल ठेवण्याचा प्रयत्नही करतात.’

स्पॅनिश लीगाचा चाहता असलेल्या रोहितने पुढे सांगितले, ‘मला झिनेदान झिदानचा खेळ खूप आवडतो. त्याच्यामुळेच मी फुटबॉल नियमितपणे पाहू लागलो. याशिवाय स्पेन संघाचे कौशल्य जबरदस्त आहे. ला लीगामध्ये याच कारणामुळे मला रियाल माद्रिद संघ आवडतो. चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार हे सांगणे कठीण आहे. पण माझी पसंती रियाल माद्रिदला आहे.’

ला लीगाच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड होणे खूप अभिमानाची बाब आहे. भारत सध्या इतर खेळांमध्ये आणि विशेष करून फुटबॉलमध्ये वेगाने प्रगती करीत आहे. कौशल्य आणि सोयीसुविधांमध्येही मोठी सुधारणा झाली आहे. आयएसएल आणि राष्ट्रीय संघाचे सामने बघताना
या गोष्टी दिसूनही येतात. आयएसएलमुळे युवा खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे. आयपीएलप्रमाणेच आयएसएलमध्ये छाप पाडून युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे येत आहेत. शिवाय देशात फुटबॉलचा प्रसारही चांगल्या प्रकारे झाला आहे; आणि यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे रोहितने सांगितले.

Web Title: Dhoni's best footballer in Indian cricket team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.