नवी दिल्ली : मोठे स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करीत आदर्श निर्माण करणारा दोन वेळचा विश्वचषक विजेता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण केली. सध्या त्याने क्रिकेटपासून ब्रेक घेतला आहे. रांचीच्या या क्रिकेटपटूने बांगलादेशविरुद्ध २००४ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारात एकूण १७,२६६ धावा केल्या आहेत.
३८ वर्षीय धोनी भारतातर्फे ३५० एकदिवसीय, ९० कसोटी आणि ९८ टी२० सामने खेळले आहेत. त्याने यष्टिमागे ८२९ बळी घेतले आहेत. आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवणाऱ्या धोनीने भारताला २०११ विश्वकप जिंकवून दिला होता. त्यात अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने मारलेला विजयी षटकार क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मर्यादित षटकांच्या समान्यात जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांत यशस्वी संघ झाला. टी२० विश्वचषक (२००७), एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक (२०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ अशा तिन्ही आयसीसी स्पर्धा जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी कसोटी व एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला.
धोनीने आयपीएल फ्रेंचाइजी चेन्नई सुपर किंग्सला तीनदा जेतेपद आणि दोन चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावून दिले. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू आहे. भारतातर्फे त्याने अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामना खेळला होता. निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर त्याने अलीकडचे म्हटले होेते की, ‘जानेवारीपर्यंत मला याबाबत काही विचारू नका.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Dhoni's career has been completed for 15 years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.