दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजय भारतीय संघासाठी अनिवार्य होता आणि तो त्यांनी मिळविला. हा सामना गमावला असता, तर मालिकाही आपण गमावली असती. शिवाय यानंतरचा सामनाही केवळ औपचारिकतेचा ठरला असता. भारतीय संघाचा या सामन्यातील खेळ पाहून खूप आनंद वाटला. कारण या आधी संघातील एक किंवा दोन फलंदाजांवर टीम इंडिया अवलंबून असल्याचे दिसून येत होते, पण या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीने महत्त्वपूर्ण योगदान देताना एक सांघिक खेळ केला. त्याच वेळी विराट कोहलीचे कौतुक जेवढे करावे ते कमीच आहे. त्याने विक्रमी २४व्यांदा धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीने पाडलेली छाप. त्याने अखेरच्या षटकात मारलेला विजयी षटकार सर्व टीकाकारांना कडाडून दिलेले उत्तर होते.
माझ्यामते सामन्याची परिस्थिती समजून घेण्यात धोनीशिवाय दुसरा उत्कृष्ट खेळाडू नाही. नक्कीच वाढत्या वयोमानामुळे त्याचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे, पण ज्याप्रकारे तो सामन्याच्या स्थितीनुसार आपला खेळ बदलतो, सहकाºयांना साथ देतो, भागीदारी करण्यावर भर देतो, अशा गोष्टींमध्ये तो क्रिकेटविश्वात सर्वोत्तम आहे. सलग दोन सामन्यांत त्याने अर्धशतक झळकावले आहे. विराटने शतक झळकावले, पण धोनी जर लवकर बाद झाला असता, तर कदाचित निकाल आपल्या विरोधातही लागला असता. याशिवाय शिखर धवन, रोहित शर्मा यांच्यासह काही प्रमाणात अंबाती रायुडूने धावा काढल्या, तसेच दिनेश कार्तिकने धोनीला मोलाची साथ देताना महत्त्वाची भूमिका बजावली.
धोनी असताना कार्तिकला खेळविण्याचा निर्णय अनेकांना खटकत आहे, पण येथे संघ व्यवस्थापनेचा विचार लक्षात घेतला गेला पाहिजे. संघात आपल्याला युवा-वरिष्ठ आणि अनुभवाच्या बाबतीत एक चांगला समतोल पाहिजे. त्यामुळेच कार्तिक, धोनीसारखे खेळाडू महत्त्वाचे ठरतात. धोनीवरील टीका चुकीची होती, असे मी म्हणणार नाही, पण त्याच वेळी ती खूप झाली, असे मात्र नक्की म्हणेन. टीव्हीवरून खेळ पाहताना सर्वकाही सोपे वाटते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती तशी नसते. ४५ डिग्री तापमानात झालेल्या सामन्यात धोनीने आधी यष्टीरक्षण केले व नंतर फलंदाजीत मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच या गोष्टींकडेही लक्ष दिले गेले पाहिजे.
शिवाय क्षेत्ररक्षणादरम्यान अखेरच्या ७-८ षटकांमध्ये कोहली सीमारेषेजवळ होता. या वेळी धोनी सर्व सूत्रे सांभाळत होता. कारण कोहलीलाही त्याची क्षमता माहीत आहे. यातून कोहलीलाही अधिक वेळ मिळाला. त्यामुळेच धोनीचे योगदान केवळ फलंदाजीत नसून, इतर सर्वच बाबतीत तो महत्त्वाचा ठरतो.
- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार