मुंबई : भारतीय संघाने विश्वचषकासाठी आपले अभियान सुरु केले आहे. आता एकदिवसीय संघात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. हेच भारताचे अंतिम 15 खेळाडू विश्वचषकामध्ये खेळतील, असे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. पण भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक यांनी मात्र महेंद्रसिंग धोनीच्या विश्वचषकातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेली आहे. निवड समितीने धोनीला ट्वेन्टी-20 क्रिकेटमधूनही संघाबाहेर काढले आहे. त्यामुळे धोनी हा फक्त एकदिवसीय संघाचाच सदस्य आहे. त्यामुळे धोनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच कमी सामने खेळताना पाहायला मिळतो. धोनी आपला अखेरचा सामना 1 नोव्हेंबरला खेळला होता आणि यापुढचा सामना तो थेट जानेवारीमध्ये खेळणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकापर्यंत भारतीय संघातील खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळले नाही तरी चालेल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. त्यामुळे जर धोनी एवढे दिवस क्रिकेटपासून लांब असेल तर त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थिर होऊ शकते, असे गावस्कर यांना वाटते.
गावस्कर याबाबतीत म्हणाले की, " धोनी आणि धवन हे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहेत, त्याचबरोबर ते स्थानिक क्रिकेटमध्येही खेळताना दिसत नाही. याबाबत या दोघांपेक्षा बीसीसीआयला सवाल विचारायला हवा. धोनी आता जवळपास दोन महिने क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे विश्वचषकातील धोनीचे स्थान धोक्यात येऊ शकते. वयानुसार खेळात बदल करावे लागतात. जर तुम्ही स्थानिक क्रिकेट खेळत असाल तर तुमची कारकिर्द विस्तारण्यात मदत मिळू शकते."