नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. निवृत्तीबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता आहे. दरम्यान, धोनीने आपण पुढील दोन महिने उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळविले असून, विंडीज दौºयातून माघार घेतली आहे. पुढील दोन महिने धोनी लष्करात सेवा बजावणार आहे.
धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. धोनी लष्करात सेवा बजावणार असल्याची चर्चा आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची निवड समिती आज, रविवारी आगामी वेस्ट इंडिज दौºयासाठी संघ निवड करणार आहे. येत्या ३ ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौºयाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. ३८ वर्षांच्या धोनीने बीसीसीआयला ही माहिती दिल्यामुळे सध्यातरी तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, धोनी इतक्यात निवृत्त होणार नाही. हा अधिकारी पुढे म्हणाला, ‘माही आताच क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही. तो निमलष्करी दलात दोन महिने सेवा देऊ इच्छितो. आम्ही हा निर्णय कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांना कळविला आहे. निवडकर्त्यांनी धोनीच्या निवृत्तीचा निर्णय घ्यायचा आहे.’धोनी वेस्ट इंडिज दौºयातून बाहेर पडल्यामुळे रिषभ पंत हा तिन्ही प्रकारात पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक बनू शकतो. कसोटी संघात रिद्धिमान साहा पंतचा जोडीदार बनू शकतो. ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी टी-२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. विश्वचषकाची तयारी म्हणून भारत अनेक आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका खेळणार आहे.