Join us  

धोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी 

वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताचा यष्टीरक्ष महेंद्रसिंग धोनीने पुढील दोन महिने लष्करी सेवेत घालवणार असल्याचे जाहीर केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:57 AM

Open in App

नवी दिल्ली - वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताचा यष्टीरक्ष महेंद्रसिंग धोनीने पुढील दोन महिने लष्करी सेवेत घालवणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, लष्करासोबत प्रशिक्षण घेण्यासाठी धोनीने परवानगी मागितली होती. अखेर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला लष्करासोबत राहून प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे.  बिपीन रावत यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर आता धोनी पॅराशूट रेजिमेंट बटालियनसह प्रशिक्षण घेणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान धोनी काही काळ जम्मू काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेणार आहे. तसेच धोनी लष्करासोबत प्रशिक्षण घेणार असला तरी तो कुठल्याही अॅक्टिव्ह ऑपरेशनमध्ये सहभागी होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. आपण काही काळ लष्करासोबत राहू, असे वचन महेंद्रसिंग धोनीने काही काळापूर्वी दिले होते. दरम्यान, विंडिज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आता धोनी या वचनाची पूर्तता करत आहे. आता पुढील दोन महिने तो लष्करासोबतच राहणार आहे. 

 वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन मालिकांसाठी रविवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला होता.  धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. धोनी लवकरच निवृत्त होणार, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबाबत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर करताना भाष्य केले. प्रसाद म्हणाले की, " धोनी कधी निवृत्त होणार किंवा अखेरचा सामना कधी खेळणार, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण हा निर्णय धोनीचा आहे आणि त्यानेच तो घ्यायचा आहे. पण याबाबत आमच्यामध्ये याबाबत चर्चा झाली आहे. धोनीने क्रिकेटमधील भविष्याबद्दल माझ्याशी चर्चा केली आहे."

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवानजम्मू-काश्मीर