आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश करणाऱ्या बांगलादेशनं टीम इंडियाला पराभूत केले. टीम इंडियाला 177 धावाच करता आल्या आणि बांगलादेशनं प्रत्युत्तरात 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीची चर्चा होत असताना भारतीय संघाचा यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या कृतीचे कौतुक होत आहे. त्यानं या सामन्यात महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं स्टम्पिंग करताना सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं बांगलादेशच्या शहादत होसैनला चपळतेनं यष्टिचीत केलं.
अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना अपयश आलं. यशस्वी जैस्वाल वगळता अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारताचा संपूर्ण संघ 47.2 षटकांत 177 धावांत तंबूत परतला. कमी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशच्या मार्गात भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईनं अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताला विजय मिळवता आला नाही. रवीनं बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर त्यानं महमुदुल हसन जॉय व तोवहीद हृदय यांना माघारी पाठवले.
रवीनं 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यष्टिरक्षक ध्रुव जुरेलसह बांगलादेशच्या शाहदत होसैनला यष्टिचीत केले. जुरेलच्या या स्टम्पिंगनं नेटिझन्सना महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली.
नेटिझन्सची प्रतिक्रिया
सामन्याचा निकाल
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून टीम इंडिया प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिव्यांश सक्सेनाला (2) अंतिम सामन्यात अपयश आले. यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पण, तिलक ( 38) 29व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. कर्णधार ध्रुव जुरेल ( 22) वगळता टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धाव करता आली नाही. यशस्वी एकाबाजूनं खेळपट्टीवर तग धरून होता. त्यानं फॉर्म कायम राखताना 121 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं 88 धावा केल्या. पण, तो बाद झाला आणि टीम इंडियाचा डाव 4 बाद 156 वरून सर्वबाद 177 असा गडगडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना परवेझ होसैन इमोन आणि तनझीद हसन यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, रवी बिश्नोईनं सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. त्यानं 10 षटकांत 3 निर्धाव षटक टाकून 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. सामना विचित्र अवस्थेत असताना बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं नाबाद 47 धावांची खेळी करताना भारताचा पराभव निश्चित केला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर 46 षटकांत 170 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.