India vs England 3rd Test Live Updates Day 2 - भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या तळाच्या ३ विकेट्सने ११४ धावा जोडल्या आणि त्यात पदार्पणवीर ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel) यानेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. शतकवीर रवींद्र जडेजा माघारी परतल्यानंतर आर अश्विन व जुरेल यांनी ८ व्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या.
त्यात जुरेलने १०४ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांचे योगदान राहिले. या कामगिरीसह जुरेलने ९० वर्षांपूर्वीच्या एका विक्रमाला आव्हान दिले. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातील ४६ धावांची खेळी ही यष्टिरक्षकाची दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. यापूर्वी १९३४ मध्ये दिलावर हुसैन यांनी इडन गार्डनवर इंग्लंडविरुद्ध ५९ धावा केल्या होत्या.
कोण आहे ध्रुव जुरेल?
- आग्राच्या ध्रुव जुरेलला युवा आशिया चषक स्पर्धेतील अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय मालिकेत आग्राच्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. १ जानेवारी २००१ रोजी जन्मलेल्या ध्रुवचंद जुरेल याने आग्रा येथील स्प्रिंगल क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटच्या बारकावे शिकले.
- ध्रुवचे वडील नेम सिंह भारतीय सैन्यात होते आणि १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांनीही पाकिस्तानला पराभूत करण्यात योगदान दिले होते. ध्रुवनेही सैनिक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आठवीत असताना ध्रुव चे नाते क्रिकेटशी जोडले गेले आणि त्याने मागे वळून नाही पाहिले. मग ध्रुवच्या वडीलांनीही आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.
- २०१८ मध्ये यूपीकडून कूच विहार ट्रॉफी खेळताना ११ सामन्यांमध्ये ७६२ धावा केल्या. यामध्ये तीन शतके झळकावली होती. यष्टींमागे त्याने ५१ बळी टिपले होते. त्याच्या चमकदार कामगिरीने यूपी कूच विहारला ट्रॉफी जिंकून दिली. २०१४ मध्ये, अंडर-१७ शालेय राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिप ट्वेंटी-२० मध्ये ध्रुवने सहा सामन्यांत चार शतके आणि दोन अर्धशतकांसह ६००हून अधिक धावा केल्या.