Join us  

श्रीलंकेत कृणालच्या उपचारात हलगर्जीपणा?; एक दिवस उशिराने कोरोना चाचणी झाल्याची माहिती समोर

घसा दुखत असल्याबाबत कृणालने बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही एक दिवस उशिराने कृणालची आरटी-पीसीआर चाचणी झाल्याची माहिती मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 9:57 AM

Open in App

नवी दिल्ली :  श्रीलंका दौऱ्यामध्ये भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोनाग्रस्त झाल्याने त्याला टी-२० मालिकेतून माघार घ्यावी लागली. मात्र, त्याच्यावर एक दिवस उशिराने उपचार झाल्याचे वृत्त समोर आले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न निर्माण झाले आहेत. घसा दुखत असल्याबाबत कृणालने बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही एक दिवस उशिराने कृणालची आरटी-पीसीआर चाचणी झाल्याची माहिती मिळाली आहे.जर कृणालची वेळीच तपासणी झाली असती, तर कृणालच्या संपर्कात आलेल्या आठ खेळाडूंवर विलगीकरणात जाण्याची वेळ आली नसती. कारण, कृणाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृणालसह त्याच्या संपर्कात आलेले आठही खेळाडू उर्वरित दोन टी-२० सामन्यात खेळू शकले नाहीत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कृणालने घसा दुखत असल्याची माहिती संघासोबत आलेले डॉक्टर अभिजित साळवी यांना २६ जुलैला दिली होती. पण, त्या वेळी कृणालची रॅपिड अँटिजन टेस्ट झाली नाही आणि इतर खेळाडूंनाही विलगीकरणात पाठवले नव्हते. विशेष म्हणजे घसा दुखत असतानाही डॉक्टरांनी कृणालला संघाच्या बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली आणि २७ जुलैला कृणालची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.या चाचणीचा अहवाल दुपारी आल्यानंतर बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संयुक्तपणे दुसरा टी-२० सामना एका दिवसाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी डॉ. साळवी यांच्याशीही वृत्तसंस्थेने संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर भारताला उर्वरित दोन्ही सामन्यांत प्रमुख खेळाडूंविना खेळावे लागले. कारण संघातील ८ खेळाडू कृणालच्या संपर्कात आल्याने त्यांना विलगीकरणात जावे लागले होते.

टॅग्स :क्रुणाल पांड्या
Open in App