मुंबई : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई केली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात गेले असून याचा लवकरात लवकर निर्णय द्या अशी मागणी इंडियन प्रीमिअर लीगमधील क्लब मुंबई इंडियन्सने केली आहे. पांड्या मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो आणि आयपीएलचे सत्र सुरू होण्यापूर्वी पांड्यावरील निकाल सुनावण्यात यावा, अशी मागणी मुंबई इंडियन्सकडून होत आहे.
बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला ही माहिती दिली. मात्र, याबाबतील रिलायन्सचे सीईओ ( स्पोर्ट्स) सुंदर रमन यांना विचारले असता त्यांनी नकार दिला. ते म्हणाले,''मुंबई इंडियन्सने बीसीसीआयशी यासंदर्भात कोणतीही चर्चा केलेली नाही.''
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या व लोकेश राहुल यांनी महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. त्या दोघांवरही निलंबनाची कारवाई झाली आहे आणि त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही माघारी बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे व ट्वेंटी-20 संघातही स्थान देण्यात आले नाही. प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी पांड्या व राहुल यांच्यावर दोन सामन्यांच्या बंदीचा सल्ला दिला होता, परंतु समिती सदस्या डायना एडुल्जी यांनी या दोघांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.
दरम्यान, बीसीसीआयने पांड्या आणि राहुल यांच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एका आठवड्यानंतर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी त्यांची बाजू घेतल्याचे निदर्शनास आले आहे. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे.खन्ना यांनी पत्रात लिहिले आहे की, " पांड्या आणि राहुल यांनी चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून माघारी बोलवण्यात आले. पांड्या आणि राहुल या दोघांनीही बिनशर्त माफी मागितली आहे. जोपर्यंत या दोघांच्या बाबतीत निर्णय येत नाही. तोपर्यंत त्यांना खेळण्याची संधी देण्यात यावी. त्यांना लवकरच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्यात यावी. "