बांगलादेशला पराभूत करून यजमान भारतीय संघाने वन डे विश्वचषकात विजयाचा चौकार लगावला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने चांगली सुरूवात केली. भारतीय गोलंदाजांना तरसवताना बांगलादेशच्या सलामीवीरांना पहिल्या बळीसाठी ९३ धावांची भागीदारी नोंदवली. सलामीवीर तंजिद हसन (५१) आणि लिटन दास (६६) यांनी अप्रतिम खेळी केली. मात्र, सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर बांगलादेशचा गड कोसळला. मग भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची कोंडी केली. पण, मुशफिकर रहिम (३८) आणि महमुदुल्लाह रियाद (४६) यांनी सावध खेळी करून भारतासमोर सन्मानजनक आव्हान उभे केले. निर्धारित ५० षटकांत बांगलादेशला ८ बाद २५६ धावा करता आल्या. बांगलादेशला प्रत्युत्तर देताना भारताने मोठा विजय मिळवला.
यजमानांच्या विजयानंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या त्रिकुटाचं अभिनंदन केलं. बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने स्फोटक सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडून विजयाकडे कूच केली. मात्र, रोहित त्याच्या अर्धशतकाला मुकला आणि (४८) धावांवर बाद झाला. तर, गिल ५५ चेंडूत ५३ धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली नाबाद (१०३) आणि लोकेश राहुलने नाबाद (३४) धावा करून भारताच्या विजयाचा चौकार मारला.
भारतीय 'त्रिकुटा'चं सचिनकडून अभिनंदनमहान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या विजयावरून टीम इंडियाचे अभिनंदन केले. यावेळी त्याने खासकरून विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या खेळीला दाद दिली. तसेच त्याने म्हटले की, मी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पाहू शकलो नाही. पण, भारतीय संघाने वन डे विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला हे पाहून आनंद झाला.
दरम्यान, किंग कोहलीने वन डे कारकिर्दीतील ४८वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाकडे कूच केली आहे. सचिनचा विक्रम मोडित काढण्यासाठी विराटला आणखी दोन वन डे शतकांची आवश्यकता आहे. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक (४९) शतके झळकावणारा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरची नोंद आहे. याशिवाय विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७८ शतकांचा टप्पा गाठला.