रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या मतभेदाचे वृत्त अनेकदा समोर आले. या दोघांनी त्यावर कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. त्यात आता टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून दोन्ही खेळाडूंमधील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. रोहित शर्मा ( Rohit Sharma) टीम इंडियाचा वन डे व ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार आहे. विराटला वन डे संघाचं कर्णधारपद सोडायचे नव्हते, परंतु बीसीसीआयनं ( BCCI) त्याला ४८ तासांची मुदत दिली होती. विराटनं काहीच उत्तर न दिल्यानंतर बीसीसीआयनं त्याच्याकडून वन डे संघाचेही नेतृत्व काढून घेतले आणि ती जबाबदारी रोहितकडे सोपवली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ( India vs South Africa) रोहित वन डे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली होती.
विराट कोहलीला २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, परंतु आता तो केवळ कसोटी संघाचा कर्णधार आहे. अशात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो वन डे मालिकेतून माघार घेण्याचेही वृत्त आहे.
विराट वन डे संघाचे कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहेत. विराटला २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करायचे होते, पण बीसीसीआयनं त्याच्याकडून हे पद काढून घेतले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ९५ वन डे सामन्यांत ६५ विजय मिळवले आहेत, तर २७ पराभव पत्करले आहेत. त्यानं कर्णधार म्हणून ७२.६५च्या सरासरीनं ५४४९ धावाही केल्या आहेत.
क्रिकबजनं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळण्यापूर्वी बीसीसीआयसमोर एक अट ठेवली होती. ती म्हणजे वन डे संघाचे कर्णधारपद दिल्यावरच, ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी स्वीकारेन, अशी होती. त्यामुळेच बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानंही विराटला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. पण, त्यानं ते ऐकलं नाही. त्यामुळेच बोर्डानं ट्वेंटी-२० व वन डे संघाचं कर्णधारपद एकाच खेळाडूकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.