Angelo Mathews Timed Out : जागतिक क्रिकेटमध्ये नुकतीच एक खळबळ उडाली. प्रथमच आयसीसीच्या या नियमाबाबत वास्तविक स्वरूपात घटना घडली. ६ नोव्हेंबरला बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथमच श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज Timed Out झाला. अशाप्रकारे बाद होणार तो जगातील पहिला फलंदाज ठरला. पण, त्याच्याविरुद्ध घेतलेल्या या निर्णयानंतर केवळ मॅथ्यूजच नाही तर संपूर्ण श्रीलंकेचा संघ इतका नाराज दिसत होता की संपूर्ण सामन्यात त्यांची ती अस्वस्थता दिसून आली. त्यातच आता अँजेलो मॅथ्यूजने थेट याबद्दलचे पुरावे सादर केले आहेत, ज्यात प्रथमदर्शनी असे दिसते की ३ मिनिटे पूर्ण होण्याआधी मॅथ्यूज मैदानात आला आहे.
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात अँजेलो मॅथ्यूज वेळेवर क्रीझवर आला होता, परंतु त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली आणि त्याने पहिला चेंडू खेळण्यास उशीर केला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने अपील केले. १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या फलंदाजाला असे बाद व्हावे लागले. श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने या घटनेचा फोटो शेअर केला. त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोन फोटो आहेत. पहिल्या फोटोत आधीचा फलंदाज बाद झाला तेव्हाची वेळ दाखवली आहे. ती वेळ दुपारी ३ वाजून ४८ मिनिटे ५० सेकंद इतरी आहे. तर दुसऱ्या फोटोत मॅथ्यूज संपूर्ण तयारनिशी मैदानात आल्याची वेळ ३ वाजून ५० मिनिटे ४५ सेकंद इतकी आहे. त्यामुळे मॅथ्यूजच्या म्हणण्यानुसार ५ सेकंदांचा अवधी शिल्लक असताना तो खेळण्यासाठी मैदानात होता. त्यामुळे त्याला बाद ठरवणे चूक आहे.
ICC चा नियम काय सांगतो?
नियमानुसार आधीचा फलंदाज बाद झाला की मैदानात जाऊन नव्या फलंदाजाने पुढचा चेंडू ३ मिनिटांच्या आत खेळायचा असतो. तसे न झाल्यास प्रतिस्पर्धी संघ याविरोधात अपील करू शकतो आणि खेळाडूला बाद ठरवले जाऊ शकते. आता मॅथ्यूजने शेअर केलेल्या फोटोंनंतर ICC पंचांबाबत काही निर्णय घेणार का? त्यावर काही स्पष्टीकरण देणार का? अशा गोष्टींबद्दल आता चर्चा सुरू झाल्या आहेत.