4 Times Team India Failed To Chase Target Under 200 Runs In A Test : बंगळुरु आणि पुण्यातील मैदान गाजवणाऱ्या किवी संघानं मुंबईच्या वानखेडेच्या मैदानातही टीम इंडियाच्या फलंदाजीतील जीव काढला. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला न्यूझीलंडच्या संघाने १४७ धावांचे टार्गेट दिले होते. भारतीय संघाला हे टार्गेट पार करून मालिकेचा शेवट गोड करण्यात अपयश आले. आघाडीच्या फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळं टीम इंडिया दिडशेच्या आतील धावसंख्या पार करतानाही २५ धावांनी कमी पडली. या पराभवामुळे घरच्या मैदानात पहिल्यांदा व्हाइट वॉशची नामुष्की टीम इंडियावर आली. एवढेच नाही तर ही चौथी वेळ होती ज्यावेळी कसोटी सामन्यात भारतीय संघाला २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना अपयश आले.
१२० धावांचा पाठलाग करताना अडखळली होती टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज (१९९७)
कॅरेबियन मैदानात भारतीय संघावर १२० धावांचा पाठलाग करताना नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले होते. १९९७ मध्ये ब्रिजटाउनच्या मैदानात वेस्ट इंडिजच्या संघानं टीम इंडियासमोर फक्त १२० धावांचे टार्गेट ठेवले होते. या सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या ८१ धावांत आटोपला होता. भारतीय संघाने हा सामना ३८ धावांनी गमावला होता.
भारतीय मैदानात न्यूझीलंडनं रचला इतिहास; १४७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा तमाशा (२०२४)
न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांची मालिका २-० अशी गमावल्यानंतर भारतीय संघ लाज राखण्यासाठी वानखेडेच्या मैदानात उतरला होता. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावत न्यूझीलंडच्या संघाला थोडक्यात आटोपण्यात यशही मिळवले. जगातील सर्वात भारी बॅटिंग ऑर्डर मानली जाणाऱ्या टीम इंडियासमोर तिसऱ्या दिवशी १४७ धावांचे टार्गेट होते. पण या धावा करताना पंतच्या अर्धशतकाशिवाय कुणालाही मैदानात तग धरता आला नाही. परिणामी टीम इंडियाचा डाव १२१ धावांत आटोपला. भारतीय संघाने हा सामना २५ धावांनी पराभवाचा सामना करत पहिल्यांदाच घरच्या मैदानात मालिका ३-० अशी गमावली.
श्रीलंकेविरुद्ध १७६ धावां काढतानाही कमी पडली होती टीम इंडिया (२०१५)
२०१५ मध्ये श्रीलंकेच्या गाले कसोटी सामन्यातही भारतीय संघावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना अपयश आले होते. श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव ११२ धावांत आटोपला होता. भारतीय संघाने हा सामना ६३ धावांनी गमावला होता.
इंग्लंडमध्ये १९४ धावांचा पाठलाग करताना झाली होती गोची (२०१८)
भारतीय संघाला २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर १९४ धावांचा पाठलाग करताना अपयश आले होते. एजबेस्टनच्या मैदानात भारतीय संघ १६२ धावांवर आटोपल्यामुळे ३१ धावांनी हा सामना गमावण्याची वेळ टीम इंडियावर आली होती.