Join us  

मोहम्मद शमी कमबॅकसाठी तयार; मग Duleep Trophy साठी का नाही झाली निवड?

वनडे वर्ल्ड कप झाल्यापासून मोहम्मद शमी क्रिकेटपासून आहे दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 2:03 PM

Open in App

 बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी अनेक भारतीय स्टार क्रिकेटर दुलीप करंडक स्पर्धेत खेळताना दिसतील. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यासारख्या दिग्गजांना देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहण्याची मुभा बीसीसीआयनं दिली आहे. 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्टार क्रिकेटर्सची वर्णी, मोहम्मद शमी मात्र बाजूलाच 

दुखापत किंवा मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करणं गरजेचे आहे. बीसीसीआयने यासंदर्भात कठोर निर्णय घेतल्यामुळेच अनेक स्टार क्रिकेटर्स दुलीप करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी राजी झाले आहेत. पण यात मोहम्मद शमीचा समावेश दिसत नाही. तो कमबॅकसाठी तयार असताना बीसीसीआयने त्याला काही अटी घातल्याची गोष्ट चर्चेत आहे. त्याची दुलीप करंडक स्पर्धेसाठी निवड का झाली नाही? हा प्रश्नही अनेक क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. इथं जाणून घेऊयात मोहम्मद शमीची या देशांतर्गत स्पर्धेसाठी निवड न होण्यामागची काय असू शकतात कारणं 

काय असू शकतात शमीला देशांतर्गत क्रिकेटपासून दूर ठेवण्यामागची कारण

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मोहम्मद शमी हा दुलीप करंडक स्पर्धेतून कमबॅक करेल, अशी चर्चाही रंगली होती. पण तो या स्पर्धेचा भाग नाही. याचा अर्थ तो बांगलादेश विरुद्धच्या मालिकेला मुकणार असा होत नाही. कारण तो संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. त्याला देशांतर्गत क्रिकेटपासून दूर ठेवण्यामागंही काही प्रमुख कारणं असू शकतात.

तो १०० टक्के फिट नसावा 

मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यन दुखापतग्रस्त झाला होता. दुखापत असतानाही तो खेळला. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. यातून सावरुन त्याने सराव करण्यास सुरुवात केली आहे.  बॅटिंग आणि बॉलिंग करतानाचे काही व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. पण तो नियमित रनअपसह गोलंदाजी करताना या व्हिडिओमध्ये दिसत नाही. तो शंभर टक्के फिट नसावा, याचे संकेत यातून मिळतात. कदाचित या  कारणामुळेच त्याची दुलीप करंडक स्पर्धेसाठी निवड झाली नसावी. 

दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक वेळ 

 

 मोहम्मद शमीच्या घोट्याला झालेली दुखापत ही खूपच गंभीर होती. त्याच्यावरील शस्त्रक्रिया होऊन अनेक महिने उलटले आहेत. त्याच्यावर जी शस्त्रक्रिया झालीये यातून सावरण्यासाठी अतिरिक्त वेळ गरजेचा आहे. या कारणामुळेच बीसीसीआयने कोणतीही रिस्क न घेता त्याला रिकव्हरीसाठी अधिक वेळ देण्याचा निर्णयही घेतलेला असू शकतो.

 ऑस्ट्रेलिया दौरा अधिक महत्त्वाचा

भारतीय संघ आगामी चार-पाच महिन्यात १० कसोटी सामने खेळणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा आहे तो ऑस्ट्रेलिया दौरा. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमी संघासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो. हा दौरा लक्षात घेऊनच बीसीसीआयने त्याला देशांतर्गत स्पर्धेपासून दूर ठेवण्याचा निर्णयही घेतलेला असू शकतो.

शमी हा देशांतर्गत क्रिकेट खेळणार नसला तरी बीसीसीआयच्या अटीनुसार, तो बंगळुरुस्थित राष्ट्रीय अकादमीत फिटनेसवर काम करणार आहे. त्यामुळे इथून त्याची थेट बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतही निवड होऊ शकते.   

टॅग्स :मोहम्मद शामीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ