नवी दिल्ली : हा फोटो शांतपणे पाहा. तुम्ही या व्यक्तीला कुठे तरी पाहिलं आहे का? किंवा या व्यक्तीला तुम्ही कुठे भेटला आहात का? किंवा या व्यक्तीबरोबर राहणाऱ्या व्यक्तींना तुम्ही ओळखता का? जर खरंच तुम्ही या व्यक्तीला पाहिलं असेल, त्याच्याबरोबर संवाद साधला असेल किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींना ओळखत असाल तर त्वरीत आयसीसीशी संपर्क साधा. कारण ही व्यक्ती मॅच फिक्सर आहे. आतापर्यंत बरेच सामने त्याने फिक्स केले आहेत. त्यामुळे सध्या तो आयसीसीच्या रडारवर आहे.
या व्यक्तीचे नाव आहे अनिल मुनव्वर. आतापर्यंत काही क्रिकेटपटूंच्या संपर्कात होता. त्याने काही खेळाडूंच्या मदतीने मॅच फिक्स केल्याचा आयसीसीला संशय आहे. पण हा अनिल आयसीसीला अजूनही सापडलेला नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर अनिलचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी या व्यक्तीबाबत माहिती शेअर करण्याची विनंती चाहत्यांना केली आहे.
काही दिवसांपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. यामध्ये कसोटी सामन्यांतील काही गोष्टी फिक्स करण्यात आल्याचे समजते आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनिलचा सहभाग असल्याचे समजले आहे. त्यामुळे आयसीसीला अनिलची चौकशी करायची आहे. भारतामध्ये स्थानिक क्रिकेट खेळलेला रॉबिन मॉरिस फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रझा हादेखील या फिक्सिंगमध्ये सामील असल्याचे कळत आहे.