मुंबई : ‘मी पहिल्या निवड चाचणीत अपयशी ठरलो होतो. त्यामुळे आणखी कठोर मेहनत घेण्यास मला प्रेरणा मिळाली,’ असे सांगताना भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शालेय विद्यार्थ्यांना कठोर मेहनतीचा संदेश दिला.
सचिनने येथील लक्ष्मणराव दुरे शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तो म्हणाला,‘ मी शाळेत असताना माझे एकच स्वप्न होते, ते म्हणजे देशासाठी खेळणे. या प्रवासाची सुरूवात वयाच्या अकराव्या वर्षीच झाली.’ तो म्हणाला,‘ मी जेंव्हा पहिल्यांदा निवड चाचणीसाठी गेलो तेंव्हा त्यांनी माझी निवड केली नाही. त्यांनी मला अजून मेहनत घेण्याची व खेळात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.’
सचिन पुढे म्हणाला,‘ मी यामुळे निराश झालो होतो. कारण मी चांगलीच फलंदाजी करतोय असे मला त्यावेळी वाटत होते. मात्र त्यानंतर मी आणखी कठोर परिश्रम घेण्यास सुरुवात केली. जर तुम्ही तुमचे स्वप्न साकार साकार करण्य्साठी सोपा मार्ग न निवडता मेहनत घेता तेंव्हा यश मिळतेच.’ आपल्या कारकिर्दीतील यशाबद्दल सचिनने प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांना श्रेय दिले. कुटुंबाने दिलेल्या सहकार्याचेही सचिनने येथे उल्लेख केला.
सचिन म्हणाला की, ‘परिवारातील सर्वच सदस्यांनी केलेल्या मदतीमुळेच मला यश मिळाले. आई-वडिलांसह माझे दोन्ही भाऊ अजित आणि नितिन यांनी खूप सहकार्य केले. माझ्या मोठ्या बहिणीने दिलेले प्रोत्साहन विसरु शकत नाही. आयुष्यातील पहिली बॅट मला तिच्याचमुळे मिळाली होती. माझ्या बहिणीने मला बॅट भेट दिली होती.’