AUS vs SL : पाच वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाने अखेर दोन पराभवानंतर सोमवारी विजयाची चव चाखली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर ५ विकेट्स राखून विजय मिळवून गुणखाते उघडले. बिनबाद १२५ अशा मजबूत स्थितीत असलेला श्रीलंकेचा संघ २०९ धावांवर गडगडला आणि त्यानंतर मिचेल मार्शच्या ५१ धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज २४ धावांवर माघारी परतल्यानंतर मार्शने ३९ चेंडूंत अर्धशतक झळकावले.
सामन्यानंतर, मार्श आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यात गमतीशीर संभाषण पाहायला मिळाले. मिचेल मार्शची फलंदाजी त्याचे वडील ज्योफ मार्श यांच्या विरुद्ध आहे, ज्यांचा स्ट्राईक रेट ११७ वन डे सामन्यांत ५५. इतका होता, तर मिचेलचा स्ट्राईक रेट ९३.८५ इतका आहे. गावस्कर हे ज्यौफ यांच्यासोबत भरपूर क्रिकेट खेळले आहेत आणि त्यामुळेच मार्श बाप-लेकाचा खेळण्याचा परस्परविरोधी दृष्टीकोन त्यांनी पाहिला आहे.
"तुझ्या वडिलांनी तुला बचावात्मक खेळायला शिकवले नाही का? (बचावात्मक शॉटसह हातवारे) कारण तू फक्त बँग, बँग, बँग करत आहेस," असे गावस्कर सामन्यानंतर म्हणाले. पण मार्शकडून पटकन एक उत्तर मिळाले. "मी फक्त त्यांचा खराब स्ट्राईक-रेटची भरपाई करत आहे".
श्रीलंकेविरुद्धचा विजय ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत आवश्यक होता, जो आता वर्ल्ड कप उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी आवश्यक तो नेट रन रेटसाठी महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यास मिचेल मार्श आणि ज्योफ मार्श हे वर्ल्ड कप जिंकणारे पहिले पिता-पुत्र बनतील. ज्योफ मार्श हे भारतात १९८७ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते.
"आमच्यासाठी खरोखर चांगला दिवस होता. आम्ही पुनरागमन केले आहे. संथ सुरुवातीनंतर थोडंसं दडपण होतं पण ती परीपूर्ण कामगिरी होती. आम्ही चांगली सुरुवात करू इच्छित असलेल्या मोठ्या अपेक्षांसह इथे आलो आहोत,''असे मार्श म्हणाला. श्रीलंकेला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकायचे असेल तर उर्वरित सर्व सहा सामने जिंकावे लागतील. शिवाय अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. ऑस्ट्रेलियाने या विजयासह दहाव्या क्रमांकावरून गुणतालिकेत ८व्या क्रमांकावर आगेकूच केलीय. श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव झाल्याने ते ९व्या क्रमांकावर घसरले आहेत.