दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यादरम्यानचे मतभेदाचे वृत्त फेटाळून लावण्याचा प्रयत्न करताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, ‘दृष्टिकोनातील अंतराला मतभेद म्हणून मानायला नको,’ असे म्हटले. यापूर्वीही दोन्ही वरिष्ठ खेळाडूंदरम्यानच्या कथित मतभेदाचे वृत्त फेटाळणाऱ्या शास्त्री यांनी पुन्हा याबाबत विचारण्यात आले.
याविषयी शास्त्री म्हणाले, ‘संघात १५ खेळाडू असतात; त्यामुळे नेहमीच अशी वेळ येते की मतप्रवाह वेगवेगळा असतो. याची गरज असते. सर्वांनी एकच मत व्यक्त करावे, असे मला वाटत नाही. चर्चा झाली तरच कुणी नव्या रणनीतीबाबत विचार करू शकतो. त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. त्यामुळे खेळाडूंना स्वत:चे मत व्यक्त करण्याची संधी मिळायला हवी. त्यानंतर सर्वोत्तम काय आहे, याचा निर्णय होईल.’ शास्त्री पुढे म्हणाले, ‘एखाद्या वेळी संघातील सर्वांत ज्युनिअर खेळाडूही अशी रणनीती ठेवू शकतो, ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. त्या रणनीतीबाबत आपल्याला विचार करण्याची गरज भासेल. त्यामुळे त्याला मतभेद म्हणून बघायला नको.’भारतीय संघ विंडीज दौºयावर रवाना होण्यापूर्वीही कर्णधार विराट कोहली यानेही रोहितसोबतच्या मतभेदाचे वृत्त फेटाळले होते.
‘..तर पाच शतके झालीच नसती!’
शास्त्री म्हणाले, ‘जर कोहलीसोबत मतभेद असते, तर रोहितने विश्वचषक स्पर्धेत पाच शतके ठोकली नसती. मी गेल्या पाच वर्षांपासून ड्रेसिंग रुमचा सदस्य आहे. खेळाडू कसे खेळत आहेत आणि संघाला कसे मजबूत करत आहेत, हे मी बघितले आहे.
Web Title: The difference in viewpoint should not be disputed - Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.