इंदूर : ऑस्ट्रेलियाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शुक्रवारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी चार सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत भारतावर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. तिसऱ्या दिवशी पहिल्या तासात एका गड्याच्या मोबदल्यात ७६ धावांचे लक्ष्य गाठून कांगारूंनी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक दिली. मात्र, टीम इंडिया अजूनही २-१ ने पुढे आहे. चौथा सामना अहमदाबाद येथे ९ ते १३ मार्चदरम्यान खेळला जाईल.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाथन लायनच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताचा दुसरा डाव केवळ १६३ धावांवर संपुष्टात आला. लायनने ८ गडी बाद केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताच्या दोन्ही फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. धावांचा पाठलाग करताना उस्मान ख्वाजाला भोपळाही फोडता आला नाही. मार्नस लाबुशेन २८ आणि ट्रॅव्हिस हेड ४९ यांनी आक्रमक फटके मारले. लाबुशेनने विजयी चौकार मारून १८.५ षटकांत भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले.
भारताने पहिल्या डावात १०९ आणि दुसऱ्या डावात १६३ धावा केल्या होत्या. नागपूर आणि दिल्ली कसोटीप्रमाणे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडेल अशी भारतीय खेळाडूंना आशा होती. आज दुसऱ्या चेंडूवर ख्वाजा अश्विनच्या चेंडूवर झेलबाद होताच दडपण वाढले. मात्र, नंतर लाबुशेन-हेड यांनी अश्विन आणि जडेजा यांचा मारा सहज खेळून काढला.
इंदूरची खेळपट्टी ‘खराब’आयसीसीने तिसऱ्या कसोटीतील इंदूरच्या खेळपट्टीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले शिवाय या खेळपट्टीला 'खराब' असे रेटिंग दिले आहे. आयसीसीने बीसीसीआयला याविरूद्ध १४ दिवसांत अपील करण्यासदेखील सांगितले आहे.
स्मिथचा विक्रम... स्टीव्ह स्मिथ २०१० नंतर मायदेशात भारताला दोन कसोटीत पराभूत करणारा दुसरा कर्णधार ठरला. आधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकच्या नावावर होता.सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने भारतात सहा वर्षांनंतर पहिला विजय नोंदविला. भारताचा दहा वर्षांत हा केवळ तिसरा पराभव आहे.
धावफलकभारत पहिला डाव : १०९, ऑस्ट्रेलिया पहिला डाव : १९७, भारत दुसरा डाव : १६३, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : उस्मान ख्वाजा झे. भरत गो. अश्विन ००, ट्रॅव्हिस हेड नाबाद ४९, मार्नस लाबुशेन नाबाद २८, अवांतर : १, एकूण : १८.५ षटकांत १ बाद ७८. बाद क्रम : १-०. गोलंदाजी : अश्विन ९.५-३-४४-१, जडेजा ७-१-२३-०, उमेश २-०-१०-०.