Dilip Kumar passes away: भारतासाठी ७ जुलै २०२१ची सकाळ ही दुःखद बातमी घेऊन आली. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (DilipKumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना हिंदुजामध्ये गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केली होती. यानुसार हॉस्पिटलने दिलीप कुमार यांना नुकताच डिस्चार्ज दिला होता. बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
तुमच्यासारखा दुसरा होणे नाही; सचिन तेंडुलकर, शाहिद आफ्रिदीसह क्रीडा विश्वातूनही दिलीपकुमार यांना श्रद्धांजली
मोठ्या पडद्यावर आपल्या अदाकारीनं मोठा प्रेक्षकवर्ग कमावणाऱ्या दिलीपकुमार यांनी क्रिकेटच्या मैदानावरही आपली चमक दाखवली होती. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे खरं आहे. दिलीपकुमार यांच्यासह सुपरस्टार राज कपूर हेही या क्रिकेट सामन्यात खेळले होते. हा सामना दिलीपकुमार विरुद्ध राज कपूर असा झाला होता. मोठ्या पडद्यावर एकमेकांचे स्पर्धक असलेले हे दोन सुपरस्टार क्रिकेटच्या मैदानावरही एकमेकांविरुद्ध खेळले होते.
१९६२ साली हा सामना खेळवण्यात आला होता. सिने वर्कर्स रिलीफ फंडसाठी निधी गोळा करण्यासाठी हा मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला होता. यूट्यूबर नईम खान याच्या अकाऊंटवर या सामन्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये वहीदा रहमान, जॉनी वॉकर, प्राण, शशी कपूर, शम्मी कपूर आदी दिग्गज दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ...
१९४४साली ज्वार भाटा या चित्रपटातून दिलीपकुमार यांच्या कारकीर्दिची सुरुवात झाली. त्यांना खरी ओळख मिळाली ती जुगनू या चित्रपटातून. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी दीदार, देवदास आणि मुगल-ए-आजम या चित्रपटात गंभीर भूमिका निभावून स्वतःची वेगळी ओळख तयार केली. त्यामुळे त्यांना ट्रॅजडी किंग म्हटले जाते.