जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेआधी भारतीय संघाला सरावासाठी कमी वेळ मिळणं ही गोष्ट कर्णधार विराट कोहलीला चिंतेचा विषय वाटत नाही. पण भारताचे माजी दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर यांच्या मतानुसार टीम इंडियाला सरावासाठी मिळणारा कमी वेळ अडचण ठरू शकते.
न्यूझीलंडविरुद्ध १८ जून रोजी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ गुरुवारी इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर तीन दिवसांच्या कडक क्वारंटाइन नियमांचं पालन करत आहे. तर न्यूझीलंडचा संघ याआधीच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला सरावासाठी भारतीय संघापेक्षा अधिक वेळ मिळाला आहे.
कोहली आणि रोहित शर्मा सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. पण प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कमी सामने खेळलेले असल्यानं सुरुवातीला थोड्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. "कोहली गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करत आहे आणि सध्याच्या घडीला त्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत समावेश केला जातो. कोहली आणि रोहित जागतिक स्तरावरील खेळाडू आहे", असं वेंगसरकर म्हणाले.
"रोहित आणि कोहली दोघंही चांगल्या फॉर्मात आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. पण सामन्यासाठीच्या तयारीसाठी सराव करण्यासाठी कमी वेळ मिळणं याचा परिणाम सामन्यात दिसू शकतो. सामन्याच्या सुरुवातीला दोघांनाही थोडं कठीण जाऊ शकतं असं मला वाटतं", असं वेंगसरकर म्हणाले.
न्यूझीलंडला होणार फायदा
"भारताचा संघ एक दमदार संघ आहे आणि जबरदस्त फॉर्मात आहे. पण न्यूझीलंडच्या संघासाठी जमेची बाजू अशी की त्यांची टीम चर्चेत नसते आणि त्यांना भारताविरुद्धच्या सामन्याआधी दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला फायदा होणार आहे. त्यांना परिस्थितीशी लवकर जुळवून घेता येईल", असं वेंगसरकर म्हणाले.
Web Title: dilip vengsarkar warns team india lack of match practice may hurt virat kohli rohit sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.