सिडनी: सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. गालेमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या दिनेश चंडीमलने एक ऐतिहासिक खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. चंडीमलने कसोटी कारकिर्दीत आपले पहिले दुहेरी शतक झळकावले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोणत्या श्रीलंकेच्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत. चंडीमलच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाच्या ३६४ धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात सर्वबाद ५५४ धावा केल्या.
दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ ने बरोबरीत ठेवण्याचे लंकेसमोर आव्हान असेल, तर दुसराही सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्यासाठी कांगारूचा संघ मैदानात आहे. चंडीमलने सामन्याच्या चौथ्या दिवशी आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा १५० धावांचा टप्पा गाठला. त्याने ३२६ चेंडूमध्ये नाबाद २०६ धावांची ऐतिहासिक खेळी करून हा कारनामा केला. त्याच्या या खेळीमध्ये १६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध रचला इतिहास
दिनेश चंडीमलने दुहेरी शतकासोबतच एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे. त्याने यापूर्वी २०१७ मध्ये दिल्लीमध्ये भारताविरूद्ध १६४ धावांची खेळी करून कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या पार केली होती. यासोबतच ऑस्ट्रेलियाविरूद्ध श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.
स्टार्कविरूद्ध षटकार ठोकून झळकावले दुहेरी शतक
जेव्हा दिनेश चंडीमल १८५ धावांवर खेळत होता, तेव्हाच त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज मिचेल स्टार्कचे आव्हान उभे ठाकले. त्यावेळी श्रीलंकेकडे एकच गडी शिल्लक होता. स्टार्कच्या या षटकामधील पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवल सलग दोन षटकार ठोकून त्याने आपले दुहेरी शतक पूर्ण केले.
Web Title: Dinesh Chandimal completes his double century with 4,6,6 in Mitchell Starc's over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.