भारतीय संघातून बाहेर गेल्यानंतर गेली दोन वर्षे फारसा चर्चेत नसला अनुभवी विकेटकिपर दिनेश कार्तिक यंदाच्या हंगामात तुफान फॉर्मात आहे. दिल्लीच्या दमदार गोलंदाजी आघाडीसमोर दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगलोरने २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली. बंगलोरच्या डावाची सुरूवात खराब झाली होती. पण मधल्या टप्प्यात मॅक्सवेल आणि त्यानंतर कार्तिकने फुल ऑन फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले बंगलोरचे सलामीवीर अनुज रावत (०) आणि डु प्लेसिस (८) स्वस्तात बाद झाले. विराट कोहली (१२) आणि प्रभुदेसाई (६) देखील झटपट माघारी परतले. पण त्यानंतर मॅक्सवेलने शाहबाज अहमदच्या साथीने डाव सावरला. मॅक्सवेलने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या.
मॅक्सवेल बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने जबाबदारी स्वीकारली. त्याने शाहबाजच्या साथीने ९७ धावांची नाबाद भागीदारी केली. कार्तिकने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावा कुटल्या. तर शाहबाजने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ३२ धावा केल्या.