Dinesh Karthik vs David Warner, IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने १६ धावांनी विजय मिळवला. RCBच्या डावात दिनेश कार्तिकने शेवटच्या टप्प्यात केलेली फटकेबाजी आणि ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक याच्या बळावर त्यांनी DC ला १९० धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नरने दमदार फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले होते. पण त्याला इतरांची साथ न मिळाल्याने दिल्लीच्या संघाला पराभव पत्करावा लागला. RCBने हंगामातील चौथा विजय मिळवत गुणतालिकेत ८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. तर दिल्लीने ५ पैकी २ सामने जिंकल्याने ते आठव्या स्थानी आहेत.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले बंगलोरचे सलामीवीर अनुज रावत (०) आणि डु प्लेसिस (८) स्वस्तात बाद झाले. विराट कोहली (१२) आणि प्रभुदेसाई (६) देखील झटपट माघारी परतले. पण त्यानंतर मॅक्सवेलने शाहबाज अहमदच्या साथीने डाव सावरला. मॅक्सवेलने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. तो बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने जबाबदारी स्वीकारली. त्याने शाहबाजच्या साथीने ९७ धावांची नाबाद भागीदारी केली. कार्तिकने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावा कुटल्या. तर शाहबाजने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ३२ धावा केल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी करायला सुरूवात केली. पण त्याला साथ देण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शला फटकेबाजी जमत नव्हती. त्याचे दडपण वॉर्नरवर आल्याने तो स्विच हिट खेळताना बाद झाला. वॉर्नरने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तो बाद झाल्यावर मिचेल मार्श २४ चेंडूत १४ धावांवर रन आऊट झाला. रॉवमन पॉवेल (०), ललित यादव (१), शार्दूल ठाकूर (१७), अक्षर पटेल (१०), कुलदीप यादव (१०) यांना फारशी फलंदाजी जमलीच नाही. रिषभ पंत १७ चेंडूत ३४ धावांवर खेळत असताना विराटने त्याचा उत्तम झेल टिपला. त्यामुळे अखेरीस दिल्लीच्या संघाला १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.