Team India T20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI सोमवारी आशिया चषक स्पर्धेसाठी १४ सदस्यीय संघ जाहीर केला आणि हाच संघ जवळपास आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्येही कायम असेल अशी शक्यता आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून कमबॅक करतील. पण, या संघावरून आता मतभिन्नता दिसत आहे. भारताचा माजी कर्णधार अजय जडेजा ( Ajay Jadeja) याने दिनेश कार्तिकच्या ( Dinesh Karthik) समावेशावरून मोठं विधान केलं आहे.
दिनेश कार्तिकने भारतीय संघात तीन वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. आयपीएल २०२२मध्ये फिनिशर कार्तिक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच निवड समितीला त्याच्या नावाचा विचार करायला भाग पाडले. कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केल्यानंतर काही चांगल्या खेळीही केल्या. दिनेश कार्तिकने आयपीएल २०२२मध्ये १४ सामन्यांत १९२ धावा केल्या आहेत.
पण, अजय जडेजाचं काही वेगळंच मत आहे. तो म्हणाला,''भारतीय संघाने आक्रमक खेळ करावा असं तुम्हाला वाटत असेल, तर माझा संघ वेगळा असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे संघात असतील, तर तुम्हाला दिनेश कार्तिक हवा. तो तुमचा इन्शुरन्स आहे. पण, जर यापैकी एकही संघात नसेल तर कार्तिकचं संघात काहीच काम नाही. त्याने माझ्याबाजूला बसून समालोचन करावे. तो चांगला समालोचक आहे, परंतु संघात मी त्याची निवड करणार नाही''
जडेजाने यावेळी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस केली. विशेष म्हणजे मागील वर्ल्ड कपनंतर शमी एकही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. ''मी शमीचा संघात समावेश करेन. मी गोलंदाजांना प्रथम प्राधान्य देईन आणि शमी ही माझी पहिली निवड असेल. त्यानंतर बुमराह, अर्षदीप व चहल यांची निवड करेन. या चौघांना संघात नक्की स्थान मिळेल. फलंदाजीचा विचार केल्यास, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव व दीपक हुडा हे माझ्या संघात असतील,''असेही जडेजाने स्पष्ट केले.