नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. आगामी कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. अशा स्थितीत दोन्ही संघासमोर कडवे आव्हान असणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा खेळाडू दिनेश कार्तिक आगामी कसोटी मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी स्टार स्पोर्ट्सवर समालोचक म्हणून दिनेश कार्तिक पदार्पण करणार आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. "ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात माझे कसोटी पदार्पण... बरं...हे पुन्हा घडतंय", अशा शब्दांत कार्तिकने आगामी मालिकेसाठी उत्साही असल्याचे म्हटले. खरं तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पण करतोय असे म्हणून कार्तिकने चाहत्यांची फिरकीच घेतली.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
- 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
- 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
- 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
- 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
- 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
- 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
- 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"