- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर )
दिनेश कार्तिक ! ३७ व्या वर्षी कारकिर्दीला कलाटणी देत विलक्षण अध्याय लिहिणारा खेळाडू. कामगिरी मनासारखी होत नसेल तर अथक मेहनत घेऊन परतता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण कार्तिकची कारकीर्द आहे. वय वाढले की संधी कमी होत जातात, या समजाला कार्तिक छेद देतो. आपण जे करतो त्यात सर्वोत्तमाचा ध्यास कसा जपायचा हे, कार्तिककडून शिकायला हवे. तुमचे काम बोलायला हवे हे, कार्तिक वारंवार सिद्ध करतो. अनुभवी आहे, वय बरेच आहे म्हणून फुकाचा पोक्तपणा कार्तिक बाळगत नाही.
फलंदाजीला बाहेर पडला की, मैदानात डीके..., डीके...,असा जयघोष होतो. त्याच्या बॅटमधून नवनवे स्ट्रोक्स बाहेर पडत आहेत. संघाला संकटातून बाहेर काढण्यास ही फटकेबाजी उपयुक्त ठरते. आयपीएलमध्ये आरसीबीसाठी आणि आता द. आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी त्याच्याकडून दिमाखदार कामगिरी वारंवार घडत आहे. डीकेचा करिष्मा समजण्यासारखा आहे. भारतीय संघात धोनीपेक्षाही सरस असे काही फिनिशर्स आहेत. हार्दिक आणि ऋषभ यांनी योग्य स्ट्रोक्सची निवड केल्यास दोघांनाही रोखणे कठीणच. अशावेळी कार्तिक स्वत:ची ओळख निर्माण करू इच्छितो. तो सहसा पाचव्या किंवा सहाव्या स्थानी फलंदाजीला येत असल्याने चेंडू फार कमी असतात. तरीही या चेंडूंचा अनुकूल वापर करणे कार्तिकच्या उल्लेखनीय यशाचा एक पैलू मानावा लागेल.
दुसरा पैलू असा की, अडथळ्यांवर मात करीत प्रतिहल्ला चढवतो. शुक्रवारी चौथ्या सामन्यात याची प्रचिती आली. त्यामुळे मालिका बरोबरीत येऊ शकली. त्याआधी डेथ ओव्हरमध्ये डीकेने मौल्यवान धावांची भर घालताच तिसरा सामना द. आफ्रिकेच्या हातून निसटला. या सातत्यपूर्ण यशामुळे डीके खऱ्या अर्थाने कामात ‘मास्टर’ ठरतो.
शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचा डीकेला लाभ झाला. मुंबईचा माजी कर्णधार अभिषेक नायर या मेंटॉरकडून डीकेने टिप्स घेतल्या. स्वत: या खेळावर लक्ष केंद्रित केले. आत्मविश्वास उंचावून मार्गातील सर्व अडथळेही दूर केले.
डीकेकडे स्ट्रोक्सची उणीव नाही. आश्चर्यकारक क्षमतेच्या बळावर तो उत्साहाने फलंदाजी करतो. परिस्थिती समजून प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे डापचेप ओळखण्यात त्याचा हातखंडा हीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली मानावी लागेल. जोखीम पत्करुन प्रत्येक आव्हानाचा तो आनंद घेत असतो. डीकेचा यंदा गतिमान उदय झाला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. तीन महिन्यांनंतर तो विश्वचषक संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत असेल, यावर विश्वास बसणार का? कोणी काहीही म्हणो; पण डीके मात्र आज, आता ऑस्ट्रेलियाकडे उड्डाण करण्यास निश्चिंत दिसत आहे.
गंमत अशी की सहा महिन्याआधी डीकेला भारतीय विसरले होते. २०२१ च्या टी-२० विश्वचषक संघात तो नव्हता. व्यावहारिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यात जमा होती. कसोटीत त्याचे स्थान कधीही निश्चित होऊ शकले नाही. झटपट क्रिकेटमध्ये मात्र महत्त्वपूर्ण खेळीच्या बळावर अखेर त्याने पुनरागमन केलेच. त्याआधी, २०१९ च्या विश्वचषकात तो खेळला खरा, मात्र उपांत्य लढतीत फ्लॉप झाला. त्यामुळे पुढील वाटचाल ठप्प झाल्यासारखीच होती. पंत, ईशान किशन, संजू सॅमसन आणि राहुल या यष्टिरक्षक- फलंदाजांमध्ये कार्तिकला वाव कुठे होता? तरीही त्याने फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली.
Web Title: Dinesh Karthik is the best player
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.