Dinesh Karthik, Pakistan: भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने दीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियात पुनरागमन केले. २०१९ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाले होते. पण त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर IPL 2022 मध्ये कार्तिकने मॅच फिनिशरची भूमिका उत्तम निभावली. त्यामुळेच त्याला टीम इंडियात कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले. नुकत्याच विंडिज विरूद्ध झालेल्या टी२० सामन्यात त्याने १९ चेंडूत नाबाद ४१ धावा कुटल्या आणि आपली उपयुक्तता पुन्हा एकदा दाखवून दिली. ३७ वर्षांच्या दिनेश कार्तिकबद्दल पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने एक विधान केले आणि स्वत:च्याच देशातील क्रिकेट बोर्डाला सुनावले.
"सध्या भारताच्या संघातील युवा खेळाडू चांगले खेळत आहेत. येत्या काळातील युवा क्रिकेटर्स भारतीय संघाकडे तयार आहेत. त्यांनी अतिशय चांगला संघ उभारला आहे. असे असतानाही दिनेश कार्तिकचं नशिब चांगलं आहे की तो भारतात जन्माला आला. तो जर पाकिस्तानात जन्माला आला असता तर आता त्याला पाकिस्तानाच डोमेस्टिक क्रिकेट संघातही खेळून दिलं नसतं", अशा शब्दांत पाकिस्तानचा सलमान बट याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुनावले.
"टीम इंडियात तरूण खेळाडू अतिशय प्रतिभावान खेळ करताना दिसत आहेत. शुबमन गिल वन डे मध्ये दमदार फॉर्मात आहे. दिनेश कार्तिक फिनिशरची भूमिका उत्तम पार पाडतोय. सूर्यकुमार यादव सारखा मधल्या फळीतील फलंदाज दिवसेंदिवस आपला खेळ सुधारत आहे. श्रेयस अय्यरसारखा अप्रतिम फलंदाजही भारताकडे आहे. अर्शदीप सिंग हा नवा गोलंदाज उत्तम गोलंदाजी करत आहे. एकूणच टीम इंडियाकडे अतिशय चांगली युवा पिढी क्रिकेटसाठी तयार आहे", असे सलमान बट म्हणाला.