IPL 2022 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने चमकदार कामगिरी केली. कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी फिनिशरची भूमिका बजावत १८३च्या स्ट्राइक रेटने ३३० धावा केल्या. या उत्कृष्ट कामगिरीमुळे दिनेश कार्तिकचे प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने रविवारी BCCI शी मजेदार संवाद साधला. या दरम्यान कार्तिकने आपली निवड, आवडते खेळाडू याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी, विविध प्रश्नांची उत्तरे देताना दिनेश कार्तिकने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या डोक्याबद्दल मजेशीर विधान केले.
"माझ्यात जर उडण्याची क्षमता असती तर मी अलास्का या ठिकाणी गेलो असतो. मी अलास्काबद्दल खूप चांगल्या छान गोष्टी ऐकून आहे. आणि जर मला मन वाचण्याची क्षमता दिली किंवा पॉवर मिळाली तर मी एमएस धोनीचं डोकं नक्की कसं काम करतं? याबद्दल अभ्यास करून त्याचं मन वाचण्याचा प्रयत्न केला असता", असे दिनेश कार्तिक म्हणाला. धोनी आणि कार्तिक यांना एकत्र टीम इंडियामध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण, कार्तिकने वेळोवेळी धोनीची स्तुती केली आहे.
या व्यतिरिक्त कार्तिकने आणखीही काही गोष्टींबद्दल खुलासा केला. "कॉफीऐवजी मी चहा निवडतो. जेव्हा मी तामिळनाडूच्या बाहेर जातो, तेव्हा मला चहा पिण्याची भरपूर संधी मिळते. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यामध्ये मला रॉजर फेडरर आवडतो. क्रिस्टियानो रोनाल्डोपेक्षा मला मेस्सीला खेळताना पाहणं जास्त आवडतं. मला वाटतं की मेस्सी थोडा वेगळा आहे. त्याचा खेळ पाहायला जास्त मजा येते. तसंच मला चित्रपट पाहायला आणि टीममेट्ससोबत टीम डिनर करायला आवडतं", अशा मनमोकळ्या गप्पा मारत कार्तिकने चाहत्यांची मनं जिंकली.